Advertisement

Coronavirus Updates: मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा ३१ मार्चपर्यंत बंद

मुंबईच्या डबेवाल्यांवर देखील कोरोना व्हायरचा परिणाम झाला आहे.

Coronavirus Updates: मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा ३१ मार्चपर्यंत बंद
SHARES

मुंबईच्या डबेवाल्यांवर देखील कोरोना व्हायरचा परिणाम झाला आहे. कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं शाळा, महाविद्यालयं, कार्यालयं, दुकानं, मॉल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. कार्यालयांसह मॉल्स व दुकानं बंद असल्यानं डबेवाल्यांच्या डबे पोहोचविण्याच्या सेवेवर ५० टक्के परिणाम झाला असून, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्यास ही सेवा काही काळ बंद ठेवण्याची वेळ डबेवाल्यांवर आली आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक २० मार्चपासून ते ३१ मार्च २०२० पर्यंत डबेवाल्यांची सेवा बंद ठेवण्यात येत आहे. १ एप्रिलपासून ही सेवा नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली.

मुंबईतील शाळा, महाविद्यालयं, शासकीय, खासगी कार्यालयं, मॉल्स, दुकानं अशा निम्म्या चाकरमान्यांना घरचा डबा पोहोचविण्याचं काम डबेवाले करीत असतात. विरार ते चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या पट्ट्यातील घर, दुकान, कार्यालयात सुमारे पाच हजार डबेवाले दररोज जेवण पोहोचवितात. ऊन असो वा मुसळधार पाऊस, दुपारच्या जेवणाच्या वेळेआधी कार्यालयात डबा पोहोचविला जातो.

सद्यथितीत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारनं शाळा, महाविद्यालये बंद ठेवली आहेत. तसंच, कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती आहे. उपस्थित कर्मचाऱ्यांपैकी अनेक जण डबेवाल्यांकडून येत असलेल्या डब्यांवर विसंबून आहेत. त्यामुळं डबेवाला नेहमीप्रमाणं डबे पोहोचविण्याचं काम करीत असले तरी कमी कर्मचाऱ्यांमुळं त्यांच्या सेवेवरही ५० टक्के परिणाम झाला आहे.

दररोज डबेवाल्यांच्या विश्वासावर निश्चिंत असलेल्या चाकरमान्यांच्या आरोग्याची काळजी डबेवालेही घेत आहेत. त्यामुळं दररोज मास्क लावणं, डबे पोहोचवित असताना हात स्वच्छ ठेवणं, जेवण वेळेत कार्यालयात पोहोचविणं आदी खबरदारी घेतली जात आहे.



हेही वाचा -

Coronavirus Updates: मुंबई, उल्हासनगरमध्ये आणखी 2 रुग्ण

कोरोनाचा फायदा उठवण्यासाठी फसवी जाहिरात, गुन्हा दाखल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा