Advertisement

कोरोनामुळे एसटी महामंडळाच्या ६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू


कोरोनामुळे एसटी महामंडळाच्या ६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
SHARES

लॉकडाऊनमुळं मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देण्यासाठी एसटी महामंडळानं वाहतूकीची सेवा दिली. वाहतुकीची सेवा देताना अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत एसटी महामंडळाच्या राज्यातील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या २३९ पर्यंत पोहोचली आहे. यापैकी ६५ कर्मचारी उपचार घेऊन घरी परतले, तर १६८ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई विभागातीलच मुंबई सेन्ट्रल, कुर्ला नेहरूनगर, परळ, उरण, पनवेल आगारांत ८६ रुग्ण असून यातील एकाचा मृत्यू आणि ठाणे विभागातील खोपट, वंदना, कल्याण, भिवंडी आगारांत एकूण १०१ रुग्ण असून यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

एसटी महामंडळाच्या मुंबई सेन्ट्रल मुख्यालयातीलही एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. उर्वरित कोरोनाबाधित कर्मचारी आणि मृत कर्मचारी हे राज्यातील अन्य आगारांतील आहेत.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे १९८ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १३८१ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत बुधवारी दिवसभरात ६२ जणांचा मृत्यू झाला आहे.

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत बुधवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६२ रुग्ण दगावले आहेत. तर ६ जुलै रोजी ३९ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ५ जुलै रोजी एकूण ६९ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

या शिवाय, बुधवारी मुंबईत कोरोनाचे १३८१ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ८७ हजार ५१३ इतकी झाली आहे. तर मुंबईत बुधवारी दिवसभरात ११०१ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ५९ हजार २३८ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.हेही वाचा -

कल्याण-डोंबिवलीत बुधवारी ४७१ नवे रुग्ण

दहीसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि मुलुंड या भागात रुग्ण वाढीचा दर अधिकसंबंधित विषय
Advertisement