Advertisement

वरळीच्या बीडीडी चाळीत वाढतोय कोरोनाचा धोका


वरळीच्या बीडीडी चाळीत वाढतोय कोरोनाचा धोका
SHARES

वरळीच्या बीडीडी चाळीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळल्यानं धोका अधिक वाढला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून बीडीडीतील रहिवाशांना विनाकारण घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. बीडीडी चाळीत बुधवारपासून ७ दिवस सक्तीनं लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची माहिती मिळते.

वरळीतील वाढती रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेनं सुरू केलेल्या प्रयत्नांमुळं देशभरात वरळी पॅटर्नची चर्चा झाली. संपूर्ण वरळीत आतापर्यंत ३०५ रुग्ण बरे झाले आहेत, तर ५० मृत्यू झाले आहेत. मात्र आता वरळीतील बीडीडी चाळीत संसर्गाचा धोका वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांत बीडीडी चाळीतील रुग्णांची संख्या ७०च्या आसपास पोहोचल्याचं समजतं.

या चाळींतील रहिवासी लॉकडाऊनच्या काळातही बाहेर फिरताना आढळत आहेत. रोज सकाळ-संध्याकाळ मैदानात फेरफटका मारणं, जिन्यावर, मजल्यावर एकत्र बसणं, गच्चीवर वेळ घालविणं असं नेहमीचे व्यवहार इथे आजही सुरू आहेत. त्यामुळं आता प्रत्यक्ष महापौरांनाच या प्रश्नी लक्ष घालण्याची वेळ आली आहे. बीडीडी चाळीतील रहिवाशांना महापौरांनी ध्वनीचित्रफितीद्वारे घरीच थांबण्याचे आवाहन केलं आहे.

रहिवाशांनी वेळीच स्वत:ला बंधने घातली नाहीत तर मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल, असाही इशारा त्यांनी दिला आहे. त्यांची ही ध्वनीचित्रफीत वरळीत मोठ्या प्रमाणावर फिरू लागल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बीडीडी चाळीत पूर्ण लॉकडाऊन करण्याची मागणी महापौरांनी पोलिसांना पत्र लिहून केली आहे. त्यानुसार बुधवारपासून या परिसरात ७ दिवस पूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचं समजतं.

मंगळवारी पोलीस अधिकारी आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी यांच्यात बैठक झाली असून त्यात हा निर्णय झाला. या टाळेबंदीमुळे लोकांना अजिबात इमारतीबाहेर पडता येणार नाही. तसेच ड्रोनने पाहणी करण्यात येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा