Advertisement

Coronavirus Updates: मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख, सरकारी नोकरी

दोन्ही पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये मदत आणि सरकारी नोकरी, तसंच नियमानुसार मिळणारी मदत दिली जाणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

Coronavirus Updates: मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख, सरकारी नोकरी
SHARES

कोरोनामुळं मुंबईतील २ पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना असून, अशा परिस्थीत सरकार त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी ठामपणं उभं आहे. दोन्ही पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये मदत आणि सरकारी नोकरी, तसंच नियमानुसार मिळणारी मदत दिली जाणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

कोरोनाविरोधातील लढाईत आपले पोलीस दल अत्यंत कठीण अशा परिस्थितीत काम करत आहे. पोलिसांच्या पाठिशी सरकार ठामपणं उभं आहे, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली. फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. कोरोना संदर्भात प्रकृतीची कोणतीही तक्रार असलेल्या पोलिसाला वा अधिकाऱ्याला तातडीनं उपचार मिळावेत याकरिता एक स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष निर्माण करण्यात आला आहे.

मुंबईसाठी सहपोलीस आयुक्त नवल बजाज तर, महाराष्ट्रासाठी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर देखील संबंधित पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक हे अशा प्रकारचे कक्ष निर्माण करण्यात येतील. तसंच मुंबईमध्ये २ हॉस्पिटल हे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्याला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचा आहे. त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावं, असंही आवाहनही गृहमंत्र्यांनी केलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा