Advertisement

जी दक्षिण विभागातील वरळी कोळीवाड्याची कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल

वरळी कोळीवाड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे.

जी दक्षिण विभागातील वरळी कोळीवाड्याची कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल
SHARES

कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जाणारा महापालिकेच्या जी दक्षिण विभागातील वरळी कोळावाड्याची आता कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली आहे. वरळी कोळीवाड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलेल्या वरळी कोळीवाड्यात सध्या केवळ १३ सक्रिय रुग्ण असून प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीतून ९० टक्के परिसर वगळण्यात आला आहे.

वरळी कोळीवाड्यात मार्चच्या अखेरीस कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर सतर्क झालेल्या महापालिकेनं पावलं उचलण्यास सुरुवात केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कोळीवाड्यात जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. लॉकडाऊन आणि संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली. कोरोनाबाधितांना रुग्णालयात, तर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आलं.

वरळी कोळीवाड्यात केवळ १३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. कोळीवाड्यातील केवळ १७ ठिकाणं प्रतिबंधित क्षेत्रात असून लवकरच ही ठिकाणेही प्रतिबंधमुक्त होणार असल्याची माहिती मिळते. वरळी कोळीवाड्याप्रमाणंच जिजामाता नगरमध्येही परिस्थिती नियंत्रणात आली आहे. कोळीवाडा, जनता कॉलनी, आदर्श नगरमध्ये ३७२ रुग्ण होते. त्यापैकी २९९ बरे झाले असून ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तिन्ही भाग लक्षात घेता तेथे २२ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील १३ सक्रिय रुग्ण वरळी कोळीवाड्यात आहेत.

वरळी, परळ, प्रभादेवी आणि आसपासच्या परिसराचा समावेश असलेल्या ‘जी-दक्षिण’ विभागात रुग्णवाढीचा दर १ टक्क्यावर आला आहे. या भागात एकूण ४ हजार ३२५ पैकी ३ हजार २२१ रुग्ण बरे झाले असून ३२० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर आजघडीला ७८४ सक्रिय रुग्ण आहेत.



हेही वाचा -

शिवसेना नेते नितीन नांदगावकरांना धमकीचा फोन

गुड न्यूज! कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा