मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिक वाढत चालला आहे. दररोज ३ अंकी आकड्याच्या स्वरुपात कोरोनाग्रस्त मुंबईत आढळत आहेत. राज्यात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असला तरी, कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत नाही आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी आणि खाजगी प्रयोगशाळांमध्ये मिळून मुंबईत आतापर्यंत कोरोनाच्या १ लाख चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, बुधवारी ७६९ नवीन रुग्ण आढळले असून, एकूण आकडा १० हजार ५२७ वर गेला आहे. आतापर्यंत केलेल्या चाचण्यांच्या तुलनेत बाधित रुग्णांचे प्रमाण १० टक्के असल्याचं आढळून आलं आहे.
मुंबईत ६ सरकारी प्रयोगशाळा व ११ खाजगी प्रयोगशाळांमध्ये मिळून १ लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. बुधवारी मुंबईत ७६९ रुग्ण आढळले असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. मुंबईतील रुग्णांची एकूण संख्या १०,५२७ वर गेली आहे. बुधवारी १५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत २२८७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण २१ टक्केआहे.
कोरोनामुळं मुंबईत बुधवारी आणखी २५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा ४१२ वर गेला आहे. मृतांमध्ये १५ पुरुष व १० महिला आहेत. तर ६ रुग्णांना कोणताही आजार नव्हता. मुंबईतील करोना रुग्णांचा मृत्युदर ३.९ टक्के आहे. मुंबईतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन येत्या १५ दिवसात मुंबईत आणखी कोरोना काळजी केंद्र उभारण्याचं पालिकेनं ठरवलं आहे.
महालक्ष्मी रेसकोर्स, नेहरू विज्ञान केंद्र, बीकेसी येथील एमएमआरडीए मैदान, माहीम निसर्गोद्यान, गोरेगाव येथील नेस्को मैदान या ठिकाणी करोना काळजी केंद्र -२ सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळं कोरोना काळजी केंद्रातील खाटांची संख्या ३४ हजार होणार आहे. जे रुग्ण कोरोनाबाधित आहेत पण त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत अशा रुग्णांना या सीसीसी २ केंद्रात ठेवले जाणार आहे. विशेषत: जे रुग्ण झोपडपट्ट्यांमध्ये राहतात अशा रुग्णांना इथं ठेवलं जाणार आहे.
धारावीमध्ये बुधवारी ६८ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. तसंच, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं धारावीमधील एकूण बाधितांची संख्या ७३३, तर मृतांची संख्या २१ वर पोहोचली आहे. धारावीमध्ये वेगानं कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी पालिकेने ‘मिशन धारावी’ हाती घेतले आहे. पालिकेचे ९ दवाखाने आणि ३५० खासगी दवाखान्यामध्ये धारावीकरांची तपासणी करण्यात येत आहे.
माहीम आणि दादरमधील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत बुधवारी वाढ झाली. माहीममधील वृंदावन इमारत, पोलीस वसाहत, साई नगर, रहेजा रुग्णालय, मोरी रोड, पाल्म ट्रस्ट इमारत, माहीम कॉजवे येथील ११ जणांना, तर दादरमधील कासारवाडी, पद्मावती चाळ, हनुमान सोसायटी, एम. सी. जावळे मार्ग, एस. बी. रोड, जय हनुमान सोसायटी येथील ८ जणांना बुधवारी कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळं माहीम आणि दादरमधील कोरोनाबाधितांची संख्या अनुक्रमे ९१ आणि ६४ वर पोहोचली आहे.
सर जे जे मार्ग पोलीस ठाण्यातील २६ अधिकारी, अंमलदारांना करोनाची लागण झाल्याने मुंबई पोलीस दलात चिंता पसरली आहे. इतके मनुष्यबळ बाधित होणारे हे राज्यातील एकमेव पोलीस ठाणे असावे. राज्य पोलीस मुख्यालयात बुधवार पहाटेपर्यंत ४९५ अधिकारी, अंमलदारांना करोनाची लागण झाल्याची नोंद होती.