मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने तसंच मुंबईकरांकडून लाॅकडाऊनचं नीट पालन होत नसल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईत लष्कराला पाचारण केलं जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यावर मुंबई पोलिसांनी खुलासा करत अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना मुंबईतील रहिवाशांना केल्या आहे. या सूचनांचं पालन केल्यावर प्रत्येकाला कोरोनापासून बचाव करता येईल, असंही मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.
४ दिवसांत १० हजार रुग्ण
देशातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून येत असल्याने केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी देखील महाराष्ट्रातील स्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १७९७३ वर गेला असून ६९४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईतच ११३९४ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. मागच्या ४ दिवसांमध्ये राज्यात १० हजार रुग्णांची भर पडल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
हेही वाचा- 24 तासांत 100 हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण
लाॅकडाऊनच्या काळात पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली माहिती :
ठिकठिकाणी गर्दी
त्याकडे पाहता महाराष्ट्रात १७ मे पर्यंत पोलिसांकडून कडक संचारबंदीचा नियम लागू करण्यात आला आहे. तरीही खासकरून रेड झोन असलेल्या मुंबईतही लोकं बिनधास्तपणे नियम मोडत रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. मेडिकल सर्टिफिकेट मिळवताना, भाजीपाला, अन्यधान्य घेताना गर्दी केली जात आहे. काही ठिकाणी पोलीस आणि नागरिकांमध्ये वादावादीच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. अशी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने मुंबईत लवकरच लष्कराला बोलवण्यात येणार? अशा बातम्या सोशल मीडियावर फिरायला लागल्या आहेत.
मुंबई पोलिसांकडून खुलासा
यावर मुंबई पोलिसांकडून खुलासा करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून मुंबईकरांशी संवाद साधताना म्हटलं आहे की, “तुमच्याकडे खूप मोकळा वेळ असल्याची आम्हाला कल्पना आहे. पण या वेळेचा वापर अफवा पसरवण्यापेक्षा इतर चांगल्या गोष्टी करण्यासाठी देखील करता येऊ शकतो. तुम्हाला जीवनाश्यक वस्तू गोळा करण्याची गरज नाही. लष्कर किंवा निमलष्करी दलाला पाचारण करण्यात आलेलं नाही. शांत रहा आणि घरीच थांबा. कोरोनाविरोधातील लढाईत हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे”.
अशा रितीने मुंबईत लष्कराला बोलवण्यात येणार ही निव्वळ अफवा असून मुंबईकरांनी उगाच घाबरून न जाता घरात शांतपणे बसून पोलिसांना सहकार्य करावं, असं म्हणणं मुंबई पोलिसांनी मांडलं आहे.
हेही वाचा- धक्कादायक! तब्बल 43 कामगार कोंबून उत्तरप्रदेशला निघालेला ट्रक पोलिसांनी पकडला