Advertisement

कोरोना व्हॅक्सीन सुरक्षितच, कर्मचाऱ्यांचं समुपदेशन करण्याची गरज- राजेश टोपे

जे आरोग्य कर्मचारी कोरोनावरील लस घेण्यास घाबरत आहेत, अशा कर्मचाऱ्यांचं समुपदेशन करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कोरोना व्हॅक्सीन सुरक्षितच, कर्मचाऱ्यांचं समुपदेशन करण्याची गरज- राजेश टोपे
SHARES

कोरोना व्हॅक्सीन पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा खुद्द वैज्ञानिकांनीच दिला आहे. त्यामुळे मनात संभ्रम निर्माण होण्याचं कुठलंही कारण नाही. जे आरोग्य कर्मचारी कोरोनावरील लस घेण्यास घाबरत आहेत, अशा कर्मचाऱ्यांचं समुपदेशन करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली. ते मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित जनता दरबारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

महाराष्ट्रात (maharashtra) पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला सुरूवात झालेली आहे. आतापर्यंत ५४ टक्के कोरोना लसीकरण झालं आहे. कोविन अॅपमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याने अॅपवर अवलंबून न राहता महाराष्ट्रात आॅफलाईन लसीकरणावर भर देण्यात येत आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर दररोज १०० जणांचं लसीकरण झालंच पाहिजे,  असे आदेश देण्यात आलेले आहेत. अॅप सुरळीत झाल्यास लसीकरणाला गती येईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

परंतु या लसीकरणादरम्यान काही आरोग्य कर्मचारी लस घेण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत. 'आधी तू लस घे मग मी घेतो' अशी मानसिकता आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये दिसत आहे. याबाबत विचारलं असता, राजेश टोपे म्हणाले, ही मानसिकता दूर करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचं समुपदेशन करण्यात येत आहे. त्यासाठी छोटे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पाठवले जात आहेत. कोरोना (coronavirus) वरील दोन्ही व्हॅक्सीन सुरक्षित असल्याची खात्री वैज्ञानिकांनीच दिली आहे. त्यामुळे कोविड लसीकरण कार्यक्रमात आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता सहभागी व्हावं, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं. 

हेही वाचा- जे.जे. रुग्णालयात दिवसभरात १०० पैकी केवळ १३ जण लसीकरणास हजर

त्याचसोबत व्हॅक्सीनबाबत चुकीचं विधान वा माहिती माध्यमांतून जाऊ नये आणि गोंधळ होऊ नये याची काळजी माध्यमांनी घ्यावी, अशी विनंती देखील यावेळी राजेश टोपे यांनी केली.

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनात लसीच्या सुरक्षिततेविषयी मोठ्या प्रमाणावर साशंकता असल्याची उदाहरणं दररोज समोर येत आहेत. विशेषत: ‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सीन’ या लसीबाबत अनेकांच्या मनात नकारात्मक भावना आहेत. त्यामुळेच आरोग्य कर्मचाऱ्यांकडून कोव्हॅक्सीन लस घेण्यास नकार दिला जात आहे. मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात लसीकरणाला मंगळवारी अत्यल्प प्रतिसाद मिळाला. 

जे.जे. रुग्णालय हे कोव्हॅक्सीन लसीकरणाचं शहरातील एकमेव केंद्र आहे. जे.जे. समूहातील सुमारे ७७५० आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. मात्र, याठिकाणी कोव्हॅक्सीन लस मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेण्यास टाळाटाळ केली. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी वरिष्ठ डॉक्टरांनी स्वत: पुढाकार घेत लस टोचून घेतल्यामुळे लसीकरणाचा आकडा कसाबसा ३९ पर्यंत पोहोचला.

(coronavirus vaccine is totally safe says maharashtra health minister rajesh tope)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा