घोडागाडी आणि व्हिक्टोरिया चालकांचे पुनर्वसन होणार

  Mumbai
  घोडागाडी आणि व्हिक्टोरिया चालकांचे पुनर्वसन होणार
  मुंबई  -  

  मुंबई शहरात पर्यटकांच्या मनोरंजनासाठी चालविण्यात येणाऱ्या घोडागाडी आणि व्हिक्टोरिया बंद करण्यात आल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनासाठीच्या योजनेस सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

  पेटाने उच्च न्यायालयात शहरात चालणाऱ्या घोडागाडी आणि व्हिक्टोरियाविरोधात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने शहरात चालणाऱ्या घोडागाडी आणि व्हिक्टोरियावर बंदी घातली होती. मात्र त्याबरोबर घोडागाडी आणि व्हिक्टोरिया चालक/मालक यांचे पुनर्वसन करण्याचे आदेशही दिले होते. याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने शिफारशी केल्या होत्या.

  न्यायालयाच्या घोडागाडी बंद करण्याच्या निर्णयामुळे सुमारे 91 घोडागाडी मालक आणि 130 घोडागाडी चालक बाधित होणार आहेत. तसेच त्यांच्याकडे असणाऱ्या घोड्यांचेही पुनर्वसन होणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन उपसमितीने केलेल्या शिफारशींनुसार संबंधित घोडागाडी चालक आणि मालक यांना उपलब्ध असलेल्या जागेवर निकषांनुसार फेरीवाला परवाना देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच फेरीवाला परवाना प्राप्त केलेल्या या बाधित घोडागाडी चालकांना 1 लाख रुपये एका वेळची एकरकमी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. फेरीवाला परवाना न घेतल्यास 3 लाख रुपयांची एका वेळची एक रकमी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.