Advertisement

निसर्ग चक्रीवादळाची मुंबई, ठाण्याच्या दिशेने कूच- आयएमडी

निसर्ग चक्रीवादळ सध्या अलिबागमध्ये पोहोचलं असून ते पुढील ३ तासांत मुंबई, ठाणे परिसरात पोहोचणार असल्याची माहिती मुंबई हवामान विभागानं दिली आहे.

निसर्ग चक्रीवादळाची मुंबई, ठाण्याच्या दिशेने कूच- आयएमडी
SHARES

निसर्ग चक्रीवादळ सध्या अलिबागमध्ये पोहोचलं असून ते पुढील ३ तासांत मुंबई, ठाणे परिसरात पोहोचणार असल्याची माहिती मुंबई हवामान विभागानं  (cyclone nisarga arrived in mumbai thane coastal area as per IMD) दिली आहे. दरम्यान रायगड जिल्ह्यातील १३५४१ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. IMD च्या मते दुपारी ३ वाजेच्या सुमारास समुद्रात १२० किलोमीटरच्या वेगाने हे वादळ धडकू शकतं. यामुळे समुद्रात ६ फुटांच्या उंच लाटा उसळू शकतील.  

चक्रीवादळाबाबत माहिती देताना प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईचे उप महासंचालक कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, हवामान खात्याचं अंदाजानुसार, सध्या निसर्ग चक्रीवादळ रायगडला धडकून पुढे उत्तरेकडे मुंबई, ठाण्याच्या काही भागांना स्पर्श करणार आहे. अलिबागला येऊन धडकलेल्या चक्रीवादळाचा वेग हा १२० किमी प्रतितास पेक्षा अधिक आहे. पुढच्या ३ तासांत चक्रीवादळ जमिनीला धडकण्याची शक्यता आहे.  

हेही वाचा - Nisarga Cyclone : जाणून घ्या, चक्रीवादळांना नावं कशी दिली जातात?

 निसर्ग चक्रवादळ कोकण किनारपट्टीवर पोहोचलं असून रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळील श्रीवर्धन, दिवे आगारच्या किनारी भागात जोरदार वारे वाहात आहेत. या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू ६० किमी प्रतितास वेगाने पुढे सरकत आहे. तर किनारी भागात धडकण्याचा वाऱ्याचा वेग हा १०० किमी प्रतितास आहे. सद्यस्थितीत हे चक्रीवादळ उरणच्या दिशेने पुढे सरकत असल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

वादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून वांद्रे-वरळी सी लिंक वरून कुठल्याही प्रकारची वाहतूक करण्यास मुंबई पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. मुंबईतील वर्सोवा बीचवर एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली असून आपत्कालीन स्थितीत मुंबईकर नागरिक हेल्पलाईन क्रमांक १९१६ डायल करून त्यानंतर ४ दाबून आवश्यक ती मदत मागू शकतात, असं सांगण्यात आलं आहे.

मुंबईतील ६ चौपाट्यांवर ९३ जीवरक्षक तैनात आहेत. रेस्क्यू बोट, जेट स्की आदी सामुग्री देखील सज्ज ठेवण्यात आली आहे. तर मुंबई महापालिकेतर्फे सुमारे ३५ शाळांमध्ये नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. आवश्यकता लागल्यास नागरिकांना स्थलांतरित होण्याचं आवाहन मुंबई पोलीस आणि महापालिकेकडून करण्यात येत आहे. 

हेही वाचा - निसर्ग चक्रीवादळाचा फटका; रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा