Advertisement

मुंबई, पुण्यातील वर्दळ परवडणार नाही- उद्धव ठाकरे


मुंबई, पुण्यातील वर्दळ परवडणार नाही- उद्धव ठाकरे
SHARES

मुंबई आणि पुण्यात लोकांची वर्दळ परवडणारी नाही. हा विषाणू अत्यंत घातक असून बिलकूल गाफील राहून चालणार नाही. चाचणीत आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांमध्ये या विषाणूची लक्षणंच दिसून आलेली नाही. तर केवळ २० टक्के रुग्णच हायरिस्कमधील आहेत. त्यामुळे एकमेकांपासून दूर राहणं खूप गरजेचं आहे. पण दूर राहणं याचा अर्थ समाजातील अंतर वाढवणं नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. 

लाॅकडाऊनचा निर्णय ३ मे नंतरच

फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले. परिस्थिती कधी बदलणार, लॉकडाऊन कधी संपणार अशी मला विचारणा होत आहे. पण लॉकडाऊनमुळेच आपण विषाणूच्या गुणाकाराचा वेग रोखण्यात यशस्वी झालो आहोत, रुग्णांची वाढ आपण नियंत्रणात ठेवली आहे. ३ मे नंतर राज्यातील लॉकडाऊनबाबत त्या त्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. सोमवार २७ एप्रिल रोजी पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्येदेखील यादृष्टीने चर्चा होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 

हेही वाचा- महाराष्ट्रातले ८० टक्के कोरोना रुग्ण कुठलंही लक्षण नसलेले- मुख्यमंत्री

मोकळीक देण्याचा प्रयत्न

कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागात २० एप्रिल -नंतर शासनाने काही व्यवहार सुरु करण्याला अटी आणि शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिली आहे. राज्यात शेतीची कामे, शेतमाल तसंच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरुच आहे. कापूस खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. फळवाहतूक सुरु आहे. फळे घरपोच देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत, असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात जिल्ह्यांच्या  सीमा बंद आहेत, त्या उघडणार नाहीत पण  काही जिल्ह्यांमधील परिस्थितीचा अभ्यास करून तिथे ३ मे नंतर काही मोकळीक देता येईल का याचा निर्णय नंतर घेण्यात येईल.

संयम गरजेचा

कोरोनासंदर्भात तज्ज्ञांचं मार्गदर्शन, जगभरातील घटना घडामोडींवर लक्ष, संशोधनावर आपण लक्ष ठेऊन आहोत, यासंदर्भातील एका सुद्धा विषयाकडे आपलं दुर्लक्ष नाही. जगभरात आपल्या देशाचे कौतुक होत आहे, आपल्या देशाने धैर्य, संयम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर संकटाचा सामना केला आहे. तसाच तो पुढे देखील पाळला तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण निश्चित जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा