Advertisement

रस्त्यांच्या कामांमधील सल्लागारांना करा गार


रस्त्यांच्या कामांमधील सल्लागारांना करा गार
SHARES

मुंबईतील रस्ते कंत्राट कामांमध्ये सल्लागारांच्या सल्ल्यानुसारच आराखडा बनवून काम केली जात आहेत. परंतु कंत्राटदारांच्या चुकीच्या सल्ल्यांमुळेच अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे बंद पडलेली आहेत. कंत्राटदारांकडून वस्तूस्थितीदर्शक सल्ले दिले जात नसल्याची बाब समोर आली. तसेच प्रत्यक्ष कामांच्या ठिकाणी सल्लागारच उपस्थितच राहत नसल्यामुळे याबाबत तीव्र नाराजी बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत व्यक्त करण्यात आली. त्यामुळे कंत्राट कामांमधील सल्लागारांना 'गार' करून हे सल्ले आपल्याच अभियंत्यांकडून घेऊन त्यांना या कामांचा प्रोत्साहन भत्ता दिला जावा, अशी मागणी समितीने केली आहे.

पूर्व उपनगरातील गारोडिया नगर घाटकोपरमधील खासगी दोन रस्त्यांच्या कामांच्या सुधारणेबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी घाटकोपरमधील एका विकास नियोजन रस्त्याबाबत प्रश्न उपस्थित केला. याठिकाणी एसआरए योजना राबवून हा रस्ता बनवल्यास येथील सात ते साडेसात हजार लोकांना हा नवा रस्ता खुला होऊ शकतो असे सांगितले. तर भाजपाचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी, सल्लागार काय सल्ला देतात, असा प्रश्न करत मुलुंडमधील चाफेकर बंधू मार्गाचे काम वस्तुस्थितीदर्शक सल्ला न दिल्यामुळे रखडले असल्याचा आरोप केला. रस्त्यांची कामे बंद आहेत. परंतु सल्लागार कधीही कामांच्या ठिकाणी येत नाही. सल्लागार सल्ल्याचे पैसे घेऊन निघून जातात आणि चुकीच्या सल्ल्यानुसार कामे बंद पडतात. मग वस्तुस्थितीदर्शन सल्ला न देण्याचे पैसे यांना दिले जाते का, असा सवाल करत हेच काम आपल्या अभियंत्यांकडून करून घेत त्यांना याचा प्रोत्साहन भत्ता दिला जावा, अशी सूचना केली.

कांदिवली चारकोपमध्ये दोन महिन्यांपासून रस्त्यांचे काम खोदून ठेवले आहे. मटेरियल नसल्यामुळे काम बंद आहे, त्यामुळे मटेरियल नसेल तर कामेच हाती घेऊ नका अशी सूचना शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांनी केली. दहिसर अशोकवनमधील रस्ते असेच खोदून ठेवल्याची तक्रार संजय घाडी यांनी केली. रस्ते कंत्राट कामांमध्ये डेब्रीजमध्ये जो भ्रष्टाचार झाला तो समोर आला आहे. परंतु ज्या रस्त्यांचे ट्रायल पीट घेण्यात आले, त्या रस्त्यांच्या सल्लागारांवर थर्डपार्टी ऑडीटरप्रमाणे कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल भाजपाचे मनोज कोटक यांनी केला. माझगावमध्येही रस्त्यांच्या कामांमध्ये पर्जन्य जलवाहिनीचे चेंबर चुकीच्या पद्धतीने बनवले आहे, त्यांचे योग्य नियोजन नसल्याची खंत व्यक्त केली. यावेळी सल्लागाराने केलेल्या आराखड्यानुसार रस्त्याचे काम केले जाते असे स्पष्ट करत यावेळी वरच्या वर खोदकाम करून रस्ते बनवण्याची संकल्पना राबवली असल्याचे सांगण्यात आले. काही रॉयल्टीच्या मुद्दयावरून मटेरियल मिळण्यास विलंब झाला होता. परंत आता मटेरियल असल्याचे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदानंद परब, अलका केरकर आदींनी चर्चेत भाग घेतला होता.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा