Advertisement

मुंबईत डेंग्यू, चिकुनगुनियाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ

मुंबईकरांना सध्या कोरोनासह साथीच्या आजरांना तोंड द्यावं लागतं आहे. साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं असून, दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.

मुंबईत डेंग्यू, चिकुनगुनियाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ
SHARES

मुंबईकरांना सध्या कोरोनासह साथीच्या आजरांना तोंड द्यावं लागतं आहे. साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं असून, दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. एकीकडं कोरोना तर दुसरीकडं साथीचे आजार यामुळं नागरिकांना दुहेरी संकटाचा सामाना करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत ऑक्टोबर महिन्यात १० दिवसांत डेंग्यूचे ९७ रुग्ण आढळले आहेत. तर सप्टेंबरमध्ये २५७ रुग्ण आढळले होते. शिवाय, चिकुनगुनियाचे प्रमाणही वाढत असून आत्तापर्यंत ३० रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत अधूनमधून येणाऱ्या पावसामुळं डेंग्यूचा प्रादुर्भाव शहरात दिवसेंदिवस वाढतच आहे. पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचते आणि अशा ठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. मुंबईत सप्टेंबरमध्ये २५७ डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. तर २०१९ आणि २०२० मध्ये या महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या अनुक्रमे २३३ आणि २१ होती.

२०२० मध्ये डेंग्यूच्या रुग्णांचे निदान कमी झाले असले तरी २०१९ च्या तुलनेतही यावर्षी रुग्णांची संख्या वाढली आहे. १ ते १० ऑक्टोबर या काळात डेंग्यूचे ९७ रुग्णांचे निदान झाले आहे. आत्तापर्यंत मुंबईत डेंग्यूचे ५७३ रुग्ण आढळले असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. २०२० आणि २०१९ मध्ये अनुक्रमे १२९ आणि ९२० रुग्ण आढळले होते.

अशी घ्या काळजी

  • डेंग्यूच्या साथीचा काळ असल्यामुळे घरात आणि घराजवळ डासांची पैदास वाढणार नाही, याची नागरिकांनी काळजी घ्यावी.
  • मच्छरदाणीचा वापर करावा. 
  • घराजवळील परिसर स्वच्छ ठेवून पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्या. 
  • ताप, अंगावर पुरळ उठणे, डोकेदुखी, सांधेदुखी अशी लक्षणं आढळल्यास तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

दुपटीने वाढ

सप्टेंबरच्या तुलनेत चिकुनगुनियांच्या रुग्णांची संख्या ऑक्टोबरच्या दहाच दिवसांत दुपटीने वाढली आहे. सप्टेंबरमध्ये चिकुनगुनियाचे सात रुग्ण आढळले होते, तर १० ऑक्टोबपर्यंत रुग्णसंख्या १५ वर गेली आहे. मलेरियाचे प्रमाण काही अंशी कमी झाले असले तरी अजूनही शहरात हिवतापाचा प्रादुर्भाव आहे. ऑगस्टमध्ये मलेरियाचे ८४८ रुग्ण आढळले होते, तर सप्टेंबरमध्ये हे प्रमाण ६०७ पर्यंत घटले आहे. १० ऑक्टोबपर्यंत १६९ हिवतापाच्या रुग्णांचे निदान झाले आहे.

स्वाईन फ्लूचे ४ रुग्ण

स्वाईन फ्लूचे प्रमाणही हळूहळू वाढत असून सप्टेंबरमध्ये फ्लूचे नऊ रुग्ण आढळले होते. ऑक्टोबरच्या दहा दिवसांतच फ्लूच्या चार रुग्णांचे निदान झाले आहे. आत्तापर्यंत स्वाईन फ्लूचे ५९ रुग्ण आढळले आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा