Advertisement

गोरेगाव : त्यांच्या मृत्यूने संतोष नगर परिसर हादरला, कुटुंबासाठी ठरला काळादिवस

गोरेगावच्या बाजीप्रभू ढोल ताशा पथकाचे हे सगळे सदस्य...

गोरेगाव : त्यांच्या मृत्यूने संतोष नगर परिसर हादरला, कुटुंबासाठी ठरला काळादिवस
SHARES

गोरेगावमधील संतोष नगर परिसर तसा गजबजलेला... पण शनिवारच्या सकाळी आलेल्या एका बातमीने परिसरात एकच शांतता पसरली... परिसरात एकच शोककळा पसरली... हा दिवस परिसरातील लोकांसाठी काळा दिवस ठरला. 

खोपोलीजवळ बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या १३ जणांमध्ये नऊ तरुण, सर्व २१ वर्षांपेक्षा कमी वयाचे आणि बाजी प्रभू ढोल ताशा पथकाचे सर्व सदस्य होते. मृतांच्या यादीत एका आठ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे, जो या ग्रुपचे स्टार आकर्षण असायचा. हे सर्व तरूण गोरेगावच्या संतोष नगर परिसरातील राहणारे. 

हे सगळे संतोष नगरच्या याच परिसरात लहानाचे मोठे झाले. इथल्या लोकांमध्ये वावरणारे... कालच तर त्यांना हसता खेळताना परिसरातील त्यांच्या निकटवर्तीयांनी पाहिले होते आणि शनिवारी सकाळी आलेल्या बातमीने सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली... 

गोरेगावच्या बाजी प्रभू ढोल ताशा पथकाचे हे सगळे सदस्य... डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी सुमारे 35 सदस्य पुण्यात कार्यक्रमासाठी गेले होते. त्यानंतर सकाळी लवकर घरी परतण्याच्या आशेने ते शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास खासगी बसमध्ये चढले.

तथापि, वाटेत बस दरीत कोसळली आणि गटातील नऊ जणांचा मृत्यू झाला आणि 19 जण जखमी झाले, त्यापैकी काहींना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

आठ वर्षांचा वीर मांडवकर, तो पथकासह पहिल्यांदा गेला होता. तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

वीरचे वडील गावी असतात. तो आईसह मामा-मामी व आजी-आजोबांकडे राहत होता. अपघाताची माहिती मिळताच आई तातडीने मामासह निघाली. वडिलांना उशिरा माहिती मिळाली. पण तेदेखील कोकणातून थेट तिकडे निघाले. त्याचे पार्थिव घेऊन येण्याची वेळ दुर्दैवी मांडवकर कुटुंबीयांवर आली.

नातेवाईकांनी सांगितले की, कुटुंबाने त्याला महिनाभरापूर्वीच सायकल विकत घेतली होती.

त्याला संगीताची आवड होती. दर रविवारी तो न चुकता सरावासाठी जात असे. तो अभ्यासातही तितकाच हुशार होता,” शेजारी राहणाऱ्या त्याच्या काही मित्रांनी सांगितले.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मृतांच्या घराभोवती जमा झाले. 

पाठक सतीश (21) आणि स्वप्नील धुमाळ (19) या दोघांचा अपघातात मृत्यू झाला.

‘सतीश धुमाळ हा युवासेनेचे काम करीत होता. त्यानंतर त्याने राजकारण सोडले. पण अंगातील जिद्द स्वस्थ बसू देत नसल्याने ढोल-ताशा पथक तयार केले. जेमतेम वर्षभरापूर्वी हे कुटुंब दिंडोशीच्या या महापालिका वसाहतीत राहायला आले आणि येताच दोन्ही भावांनी हिरीरीने सामाजिक कार्य सुरू करीत हे पथक तयार केले’, अशी आठवण धुमाळ कुटुंबीयांच्या शेजाऱ्यांनी सांगितली.

“सतीशनेच पहिल्यांदा संगीत शिकायला सुरुवात केली आणि त्याचा धाकटा भाऊही नंतर शिकायला लागला. तीन वर्षांपूर्वी त्यांनी परिसरातील इतर तरुणांना सोबत घेऊन गट तयार करण्यास सुरुवात केली. वर्षभरापूर्वी, त्यांना कॉलनीच्या बाहेरच्या कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करण्यासाठी कॉल येऊ लागले  होते, असे त्याच्या एका मित्राने सांगितले.” 

सतीश एका विमा कंपनीत अर्धवेळ काम करत होता आणि स्वप्नील हा बी.कॉम.च्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. या गटाचे जवळच्या खडकपाडा परिसरात एक छोटेसे, भाड्याचे कार्यालय होते, जिथे ते त्यांची वाद्ये ठेवत असत. वीकेंडला ते जवळच्याच म्युनिसिपल ग्राउंडवर रिहर्सल करायचे.

या वस्तीच्या जवळच शिवनेरी हाऊसिंग सोसायटी असून या ठिकाणी मृतांपैकी एक राहुल गोठल (१७) राहत होता.

राहुल गोठल यंदा बारावीत गेला होता. घरी गतीमंद असलेली थोरली बहिण आणि आई-वडीलांना मागे सोडून कायमचा निघून गेला. त्याच्या रुपात आई-वडिलांनी बघितलेले स्वप्न क्षणार्धात धुळीला मिळाले. दिंडोशीतीलच खडकपाडा परिसरातील शिवनेरी बैठी चाळ सोसायटीत राहुल गोठणचे कुटुंबिय राहते. वडीलांच्या हाती काम नसल्याने आई घरकाम करणारी. थोरल्या बहिणीची अवस्थादेखील बिकट, या स्थितीत जेमतेम एका खोलीच्या घरात राहून राहुलने अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले. बारावी करुन घर चालविण्यासाठी हातभार लावण्याचा त्याचा निर्धार होता. 

“संतोष नगरमधील काही रहिवाशांकडून त्याच्या वडिलांना अपघाताची माहिती मिळाली. काय घडले याची त्याला खात्री नसल्यामुळे, त्याने राहुलच्या आईला त्याच्या अचानक प्रवासाचे कारण न सांगता पहाटेच खोपोलीकडे धाव घेतली,” असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. 



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा