Advertisement

'शिवाजी महाराजांना नजरेसमोर ठेवाल, तर हिंदुस्थानचा विकास होईल'


'शिवाजी महाराजांना नजरेसमोर ठेवाल, तर हिंदुस्थानचा विकास होईल'
SHARES

शिवाजी महाराजांनी समाजाला आदर्शाकडे नेले. जगात अनेक आदर्शमय व्यक्तिमत्व असतात. पण ती स्वतः आणि आजूबाजूच्या व्यक्तींसाठीच मर्यादित राहतात. परंतु, शिवाजी महाराजांनी समाजाला भ्रष्टाचारमुक्त केले. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व नजरेसमोर ठेऊन समाज वागला तर, हिंदुस्थानचा विकास होईल आणि त्याची प्रतिमा जगासमोर उजळेल, असे उद्गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुधवारी शिवाजी मंदिर येथे काढले. 'शिवाजी महाराज' या पुस्तकावर आधारित माहितीपटाच्या प्रकाशन सोहळ्याच्या समारंभात ते बोलत होते.

शिवाजी ज्ञानपीठाचे अध्यक्ष हेमंतराज गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा अभ्यास करून 'शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट' नावाचा ग्रंथ आणि माहितीपट (डॉक्युमेंट्री) तयार केली आहे. या डॉक्युमेंट्री आणि ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याहस्ते दादरच्या शिवाजी मंदिर सभागृहात बुधवार 7 जून 2017 रोजी पार पडला. यावेळी महाराष्ट्र साहित्य पुरस्कार विजेते पी. के. घाणेकर आणि महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य सदाशिव शिंदे यांच्यासह अनेक शिवप्रेमी आणि शाहिरांनी उपस्थिती लावली.

सगळ्या जगाला शिवाजी महाराजांची ओळख करून देणे, हेच शिवाजी ज्ञानपीठाचे उद्दिष्ट आहे. हा ग्रंथ जगाला शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख करून देणारा ग्रंथ आहे. अलेक्झांडरपासून ते नेपोलियनपर्यंतच्या योद्ध्यांशी तुलना करून शिवाजी महाराज हे कसे महान योद्धे तसेच लोकप्रिय राजे होते, याचे स्पष्टीकरण करून देणारा हा ग्रंथ आहे. प्रस्तुत ग्रंथात महाराजांच्या चरित्राचे सर्व प्रस्तुतीकरण केलेल आहे. तुमचा आमचा शिवबा हा 100 नंबरी सोने नसून जगाच्या दालनात लखलखणारा 64 पैलूंचा हिरा आहे. शिवाजी महाराज कसे थोर व्यक्ती आणि महान राजे होते, हे या ग्रंथातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे हेमंतराज गायकवाड म्हणाले.344व्या शिव राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त यावेळी ज्येष्ठ इतिहासकारांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय इतिहासकार मोहन आपटे आणि लाल महाल उत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष पांडुरंग बेलवलकर यांचा पेशवे मोरोपंत पिंगळे पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा