Advertisement

फुटपाथचं रेलिंग कापलं, डोसा विक्रेत्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद


फुटपाथचं रेलिंग कापलं, डोसा विक्रेत्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
SHARES

मुलुंडमधल्या झवेरी रोडवरील फुटपाथचं रेलिंग कापतानाचा व्हिडिओ समोर येताच खडबडून जागे झालेल्या पालिकेने तात्काळ कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण हेच आश्वासन हवेत विरल्याचं चित्र समोर येत आहे. कारण दिवसाढवळ्या फुटपाथवरील रेलिंग कापणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात फक्त अदखलपात्र गुन्हा नोंदवून मुलुंड टी वॉर्डकडून कारवाईचे सोपस्कार पार पाडण्यात आले.


सरकारी मालमत्तेचं नुकसान 

झवेरी रोडवरील अनधिकृतरित्या डोसा विक्रेत्याने ४ ते ५ दिवसांपूर्वी भरदिवसा फुटपाथवरील रेलिंग कापलं. पण याचा महापालिकेला थांगपत्ताही नव्हता. मंगळवारी त्या संबंधित व्हिडीओ समोर येताच महापालिका खडबडून जागी झाली. त्या फेरीवाल्यांसोबतच संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल, असं आश्वासन पालिकेने दिलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र त्या फेरीवाल्यांविरोधात फक्त अदखलपात्र गुन्हाच नोंदवून पालिकेने आपले हात झटकले. त्यामुळे सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं म्हणजे फक्त अदखलपात्र गुन्हा आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.



फुटपाथवरील कापलेले रेलिंग सध्या त्या ठिकाणी नाहीत. ते कुठे आहेत? हे देखील पालिकेला माहीत नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे मॅनहोलची झाकणे गायब झाल्यानंतर पालिकेकडून चोरीचा गुन्हा नोंदवला जातो, तसा गुन्हा या लोखंडी रेलिंग प्रकरणी का नोंदवता येणार नाही? हे कोडंच म्हणावं लागेल.

गुन्हा दखलपात्र की अदखलपात्र हे ठरवण्याचे काम पोलिसांचं आहे. आमच्याकडून संबंधित पालिका अधिकाऱ्याला या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. त्या उत्तरावर पुढील कारवाई ठरवली जाईल.
- किशोर गांधी, अतिरिक्त आयुक्त, मुलुंड टी वॉर्ड

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा