Advertisement

घाटकोपरमधल्या नव्या नाट्यगृहाचा पडदा उघडेना


घाटकोपरमधल्या नव्या नाट्यगृहाचा पडदा उघडेना
SHARES

घाटकोपर पूर्व भागातील पंत नगरमध्ये आरक्षण समायोजनांतर्गत बांधून तयार असले तरी ते अद्याप ताब्यात न घेतल्यामुळे आजही हे नाट्यगृह उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. मागील तीन वर्षांपासून नाट्यगृहाची इमारत बांधून तयार आहे. मात्र, अद्यापही याठिकाणी नाट्यगृह सुरु करण्यास प्रशासनाची इच्छा नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिका गटनेत्या राखी जाधव यांनी केला आहे. त्यामुळे हे नाट्यगृह त्वरीत घाटकोपर आणि पर्यायाने पूर्व उपनगरांतील नाट्य रसिकांसाठी खुले करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.


नेमकी  समस्या काय?

घाटकोपर पंतनगर येथील सुमारे 2 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर  झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत आरक्षणाअंतर्गत नाट्यगृहाची इमारत बांधण्यात आली आहे. मात्र, हे नाट्यगृह तयार आहे. परंतु तीन वर्षे झाले तरी याचा ताबा घेण्यात आला नसल्याची बाब हरकतीच्या मुद्द्याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिका गटनेत्या राखी जाधव यांनी  स्थायी समितीच्या निदर्शनास आणली.

गेल्या तीन  वर्षांपासून ही वास्तू तयार असतानाही ती ताब्यात घेतली किंवा नाट्यरसिकांसाठी खुली करून दिली जात नाही. परिणामी पूर्व उपनगरातील कुर्ला ते कांजूरमार्ग, भांडुपच्या नाट्यरसिकांना आजही दादरला शिवाजी मंदिर, यशवंत नाट्यमंदिर किंवा मुलुंडला कालिदास नाट्यगृह आदी ठिकाणी जावे लागत आहे.



वादावर पडदा पडेना

हे नाट्यगृह 600 आसनी बांधण्यात येणार होते. परंतु प्रत्यक्षात 200 आसनीच बांधण्यात आले आहे. त्यामुळे कमी आसनाचे हे नाट्यगृह का बांधले? विकासकाला अशाप्रकारे कमी आसनांचे बांधण्याची कुणी परवानगी दिली याचाही खुलासा करण्यात यावा, अशी मागणी राखी जाधव यांनी केली आहे. प्रशासन जाणीवपूर्वक ही वास्तू ताब्यात घेत नाही, असा आरोप करत नाट्यगृहाची जागा ताब्यात न घेण्यामागे नेमके काय कारण आहे, याचाही खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे त्यांचा हा हरकतीचा मुद्दा स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी राखून ठेवला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा