रेल्वे स्टेशनवर पाणपोई की पिंकदाणी?

 Ghatkopar
रेल्वे स्टेशनवर पाणपोई की पिंकदाणी?

उष्णतेची लाट सर्वत्र मुंबईत पसरू लागली आहे. मुंबईकरांची जीवनदायिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून दरदरोज लाखो लोक प्रवास करतात. पण, रेल्वे प्लॅटफॉर्मवरच्या पाणपोईंची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात प्रवाशांच्या घशाला कोरड पडत आहे. पाणपोईची अवस्था पाहिल्यानंतर त्या ठिकाणी कोणीही पाणी पिऊ शकत नाही.

घाटकोपर स्टेशनवरील पाणपोईची अवस्था अत्यंत वाईट आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर एकच पाणपोई आहे. पण तिला पाणपोई बोलायचे की पिंकदाणी प्रश्न सर्व प्रवाशांना नक्की पडत असेल. कारण चौकोनी डब्याच्या आकाराची ही पाणपोई असून पाणी पिण्यासाठी येथे तीन नळ लावण्यात आले आहे. या ठिकाणचे तिन्ही नळ उखडले असून प्रवाशांनी गुटका, तंबाखू आणि पानाच्या पिचकाऱ्यांनी पाणपोईची पिंकदाणी केल्याचे दिसत आहे. या पाणपोईच्या शेजारी वॉशबेसीन आहे. याची अवस्था पाणपोईपेक्षा फार काही वेगळी नाहीये.

तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील पाणपोई ही नोव्हेंबर 2016 मध्ये स्वच्छ करण्यात आली होती. त्यानंतर नवीन वर्षात या पाणपोईवरील पाण्याची टाकी स्वच्छ केली नाही. पण, वाढत्या तापमानामुळे प्रवाशांच्या घशाला कोरड पडली की, या पाणपोईचे पाणी पिण्या शिवाय पर्याय रहात नाही. छोट्या जाहिराती, हरवलेल्या लोकांचे पोस्टर चिटकवून या पाणपोईचे विद्रुपिकरण केले आहे.

घाटकोपरच्या प्लॅटफॉम क्रमांक 4 वर तर पोणपोईची सोयच नाही. उन्हाळा येण्याच्या आधी मुंबईतील प्रत्येक प्लॅटफॉर्मवरील पाणपोई रेल्वे प्रशासनाने स्वच्छ करणे गरजेचे होते. पण तसे जाले नाही, असे मत प्रवासी प्रियांका कांबळे यांनी व्यक्त केले. प्लॅटफॉर्मच्या पाणपोईच्या दुरवस्थ संदर्भात घाटकोपर स्टेशन प्रबंधक आर. के. सांबरिया यांना विचारल्यावर त्यांनी उत्तर द्यायला टाळाटाळ केली.

Loading Comments