हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा दिल्यानं मुंबईकरांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. या मुसळधार पावसामुळं पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं शाळा, कॉलेज तसंच, सरकारी आणि खाजगी कार्यालयांना सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Due to heavy rain forecast in Mumbai even today by IMD, People are advised to stay indoors unless there is any emergency.#MumbaiRainsLive #MumbaiRainsLiveUpdates #MumbaiRains
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 2, 2019
मध्य रेल्वेवरील कुर्ला, घाटकोपर, सायन स्थानकातील रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं ठाणे ते मुंबई रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रद्द, मनमाड-एलटीटी एक्सप्रेस रद्द, नागपूर-मुंबई नंदीग्रामध्ये एक्सप्रेस नाशिकहून वळवली आहे. डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या पुण्याजवळ थांबविण्यात आल्या आहे.
रेल्वे स्थानकांवर उद्घोषणा करुन अनिश्चित काळासाठी रेल्वे सेवा ठप्प झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या हार्बर रेल्वे - सीएसएमटी ते वांद्रे, वाशी ते पनवेल वाहतूक सुरु आहे, तर ट्रान्सहार्बर ठाणे-वाशी-पनवेल सुरु आहे. तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. वसई-विरारहून निघणाऱ्या ट्रेन्स ४५ मिनिटं उशिरानं धावत आहेत. तसंच, पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकल दिवसभरासाठी रद्द करण्यात आली आहेत.
भुसावळ-मुंबई पॅसेंजर,
पुणे-पनवेल-पुणे पॅसेंजर,
मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस,
मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस,
मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पश्चिम रेल्वेवरील वांद्रे-वापी पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे,
सुरत-विरार पॅसेंजर डहाणूपर्यंत चालविण्यात येत आहे.
वांद्रे-सुरत इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.