Advertisement

मुंबईकरांनो! फेरीवाल्यांकडील बर्फ खाल तर...


मुंबईकरांनो! फेरीवाल्यांकडील बर्फ खाल तर...
SHARES

सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे थोडासा गारवा मिळावा म्हणून सर्वचजण रस्त्यावर विकले जाणारे बर्फ टाकलेले पेय, गोळा याकडे खेचले जातात. पण जरा जपून. कारण या रस्त्यावर विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांकडील खाद्यपदार्थ किंवा बर्फ टाकलेले पेय घेतलेत तर आजारी पडू शकता. या फेरीवाल्यांकडील 75 टक्के बर्फ नमुन्यांमध्ये ‘ई-कोलाय’ नावाचे जीवाणू आढळून आले आहेत. त्यामुळे तुम्हाला गॅस्ट्रो (अतिसार), जुलाब, कॉलरा, कावीळ, टायफाईड यांसारखे जलजन्य आजार जडू शकतात. सामान्यपणे मानवी विष्ठेमध्ये ई-कोलाय जीवाणू आढळून येतात.

महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने महापालिका क्षेत्रातील सर्व 24 विभागांमधील खाद्यपदार्थ आणि पेयपदार्थ विकणारे फळांचे ज्यूस सेंटर, उसाच्या रसाचे स्टॉल्स, बर्फाचे गोळे, लस्सी आणि ताक विक्रेते, फास्ट फूड सेंटर्स या फेरीवाल्यांकडील बर्फाचे नमुने तसेच हॉटेलमधील बर्फाच्या नमुन्यांची चाचणी केली असता जवळपास 96 टक्के बर्फ नमुने हे खाण्यासाठी अयोग्य असल्याचे आढळून आले आहे. याच नमुन्यांपैकी 75 टक्के नमुन्यांमध्ये ‘इ-कोलाय’ जीवाणू आढळून आले आहेत. याशिवाय फेरीवाल्यांकडील 10 टक्के पाणी नमुन्यांमध्येही ई-कोलाय जीवाणू आढळून आले आहेत. ही बाब लक्षात घेता फेरीवाल्यांकडील, रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाऊ नयेत, बाहेरील पाणी, सरबत, ऊसाचा आणि फळांचा रस इत्यादी पिणे टाळावे, तसेच पाणीपुरी, भेळपुरीसारखे पदार्थ खाणेही टाळावे असे आवाहन महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने केले आहे.

तसेच, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जेवणापूर्वी आणि अन्न शिजवताना, तसेच शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत, घरी शिजवलेले ताजे अन्न खावे, हिरव्या पालेभाज्या- फळे स्वच्छ धुवून खावेत, तसंच वैयक्तिक स्वच्छता काटेकोरपणे राखण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. मळमळ, उलटी, जुलाब यांसारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अशी सूचना डॉ. पद्मजा केसकर यांनी केली आहे.

महापालिकेच्या 24 प्रशासकीय विभागांच्या क्षेत्रातील खाद्यपदार्थ आणि पेयपदार्थ विक्रेत्यांकडील बर्फ आणि पाणी नमुन्यांची चाचणी 1 एप्रिल ते 25 एप्रिल 2017 या कालावधीत करण्यात आली. या चाचणी दरम्यान महापालिकेच्या 24 पैकी 14 विभागांत 100 टक्के बर्फ नमुने हे खाण्यासाठी आणि पिण्यासाठी अयोग्य असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या 24 विभागांमध्ये आढळून आलेल्यांपैकी सर्वाधिक प्रमाण गोवंडी, देवनार या परिसरात समावेश असणाऱ्या एम पूर्व विभागात आढळून आले आहे. खाद्य आणि पेय पदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांकडील बर्फ हा आईस फॅक्टरीमध्ये तयार होत असल्याने त्याबाबत कारवाई करण्यासाठी राज्य शासनाच्या अन्न आणि औषध खात्याला (एफडीए) कळवण्यात आले आहे, अशीही माहिती महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. केसकर यांनी दिली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा