Advertisement

बर्फाचा गोळा खाताय? ...तर जरा जपून


बर्फाचा गोळा खाताय? ...तर जरा जपून
SHARES

मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने नुकत्याच केलेल्या कारवाईतून शहरातील फेरीवाल्यांकडील 75 टक्के बर्फांच्या नमुन्यांमध्ये ई-कोलाय नावाचे विषाणू आढळून आले होते. ही माहिती सार्वजनिक झाल्याने रस्त्यावरील थंड पेय पिताना वा गोळा खाताना अनेकांच्या पोटात गोळा येण्यास सुरूवात झाली आहे.

ई-कोलाय विषाणू असलेल्या बर्फापासून बनवलेले थंडपेय वा गोळा खाल्ल्यास त्यातून गॅस्ट्रो, कॉलरा, काविळ सारखे आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे दूषित बर्फ बनविणाऱ्या फॅक्टरींविरोधात कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र त्याची जबाबदारी असलेल्या अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) कडून म्हणावी दखल घेतली जात नसल्याने महापालिकेने पुढाकार घेऊन फेरीवाल्यांकडील दूषित बर्फाचे नमुने घेण्यास सुरूवात केली. अखेर पालिकेच्या कारवाईनंतर उशीराने का होईना पण 'एफडीए'ला जाग आली असून त्यांनीही बर्फाचे नमुने घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेंतर्गत बर्फाच्या फॅक्टरीसहित, थंड पेयांचे स्टॉल आणि बर्फ गोळा विक्रेत्यांकडील बर्फाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत असल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे यांनी दिली आहे.

मुंबईत वाढलेल्या उकाड्यापासून शरीराला थोडासा थंडावा मिळावा म्हणून थंड पेयांसह बर्फाचे गोळे खाण्याकडे मुंबईकरांचा कल अधिक असतो. त्यामुळे सद्यस्थितीत थंडपेय, ज्यूस आणि बर्फाच्या गोळ्यांची मागणी वाढली आहे. मात्र या थंडगार पदार्थांचा आस्वाद घेताना बऱ्याचदा आरोग्याकडे दुर्लक्ष होते.
यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे शहरातील फेरीवाल्यांकडे असलेला बहुतांश बर्फ हा दूषित पाण्यापासून बनवलेला असतो. हा बर्फ अखाद्य श्रेणीतील म्हणजेच केवळ स्टोरेजच्या वापरासाठी असतो. परंतु फेरीवाले हा बर्फ खाद्यपदार्थ बनविण्यासाठी वापरतात. या दूषित बर्फात ई-कोलाय विषाणू आढळून येत असल्याने असा बर्फ खाणे आरोग्यास घातक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर एफडीएने सुरू केलेली मोहीम महत्त्वाची ठरणार आहे.

एफडीएच्या तपासणीत बर्फाच्या नमुन्यात ई-कोलायचा विषाणू आढळून आल्यास संबंधित दुकानदार, फॅक्टरी मालकाविरोधात कडक कारवाई करून त्यांच्याविरोधात खटले दाखल करण्यात येणार असल्याचेही अन्नपुरे यांनी सांगितले.
दरम्यान, 'एफडीएने' मुंबईकरांनी 'एफएसएसएआय' शिक्का असलेला, सिलपॅक बर्फ वापरावा तसेच रस्त्यावरील बर्फाचे गोळे, थंडपेय खाणे टाळण्याचे आवाहनही मुंबई लाइव्हच्या माध्यमातून मुंबईकरांना केले आहे.

'एफएसएसएआय'च्या नियमांकडे दुर्लक्ष -
खाद्य आणि अखाद्य असे बर्फाचे दोन प्रकार आहेत. त्यानुसार खाद्य बर्फ हा ई-कोलायमुक्त स्वच्छ पाण्यापासून, सर्व चाचण्या पूर्ण करत तयार केलेला असतो आणि हाच बर्फ खाण्यासाठी वापरणे बंधनकारक आहे. तर अखाद्य बर्फ मटण, मासे आणि इतर अन्नपदार्थ वा घटकाच्या स्टोरेजसाठी वापरला जातो. मात्र मुंबईसह देशभर स्टोरेजसाठीचा बर्फ थंडपेय, ज्यूस आणि बर्फाचा गोळ्यात सर्रासपणे वापरला जात आहे. अशाच बर्फामध्ये ई-कोलायचे विषाणू आढळून येत असल्याचेही अन्नपुरे यांनी स्पष्ट केले आहे.

'एफएसएसएआय' अर्थात 'फूड सेफ्टी अॅण्ड स्टॅंडर्ड अॅक्ट'नुसार स्टोरेजसाठीही खाद्य बर्फच तयार करणे आणि वापरणे बंधनकारक आहे. मात्र अखाद्य बर्फ स्वस्त पडत असल्याने असाच बर्फ थंडपेय आणि गोळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जात असल्याची माहिती आईसलिंग्सचे मालक रूस्तम ईराणी यांनी दिली. 'एफएसएसएआय'चे नियम, मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करत ग्राहकांच्या जीवाशी हा खेळ सुरू असून हा खेळ रोखण्यासाठी एफडीए आणि पालिकेने सक्रिय व्हावे, अशी मागणीही ईराणी यांनी केली आहे. लोकांमध्येही त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईकर करतात दररोज 500 टन बर्फ फस्त -
मुंबईत सद्यस्थितीत दिवसाला खाद्य बर्फाची मागणी 5 लाख किलो अर्थात 500 टन इतकी असल्याची माहिती ईराणी यांनी दिली. ही केवळ खाद्य, ई-कोलायमुक्त बर्फांची मागणी आहे. स्टोरेजसाठी वापरण्यात येणाऱ्या अखाद्य बर्फाचा आकडा आणखी वेगळा आहे. बर्फाला इतकी मोठी मागणी असताना अधिकृत, नोंदणीकृत फॅक्टरी मात्र मुंबईत तीन तर नवी मुंबईत पाच-सहा आहेत. या फॅक्टरीमध्येच खाद्य बर्फ तयार केला जातो. तर अखाद्य बर्फ तयार करणाऱ्या फॅक्टरींनी स्टोरेजासाठीही खाद्य बर्फ तयार करणे बंधनकारक आहे. मात्र तसे होत नसल्याने 25 एप्रिल 2017 ला 'एफएसएसएआय'ने मार्गदर्शक तत्वे जारी करत स्टोरेजसाठी खाद्य बर्फच तयार करण्याचे आदेश या फॅक्टरी मालकांना दिले आहेत. त्यामुळे आता तरी हे फॅक्टरी मालक या मार्गदर्शक तत्वांचे पालन करतात की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा