SHARE

इमानला पुढच्या दोन दिवसात डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती सैफी रुग्णालयातले बेरिअॅट्रिक सर्जन डॉ. मुफ्फझल लकडावाला यांनी दिलीय. इमानची प्रकृती आता स्थिर असून अतिलठ्ठपणामुळे तिला असणारा धोका आता कमी झाला आहे. त्यामुळे इमानला रुग्णालयात राहण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे पुढच्या दोन दिवसात इमानला डिस्चार्ज देण्यात येईल, असे डॉ. लकडवाला यांनी स्पष्ट केले. तसेच इमानच्या बहिणीने केलेल्या वक्तव्यामुळे आपण दुखावलो असल्याचे सांगत इमानसाठी खूप प्रेमाने प्रयत्न केले आहेत. आता देवाचा आशीर्वाद इमानवर राहो, अशी प्रतिक्रीयाही डॉ. लकडवाला यांनी दिली आहे.

इमानची बहीण शायमाने एका व्हिडिओद्वारे डॉ. लकडावाला खोटे बोलतात असे म्हटले आहे. तसेच ते इमानची पुरेशी काळजी घेत नसल्याचा आरोप शायमाने केला आहे. इमानचे वजन 100 किलोपेक्षा कमी झालेले नाही. डॉक्टरांनी तिच्या तपासण्या करून वर्षभर तिच्यावर रुग्णालयात उपचार होतील, असे सांगितले होते. पण, आता अवघ्या तीन महिन्यांत तिला घरी सोडण्यात येत असल्याचे शायमाने म्हटले आहे. त्याचबरोबर इमान कधीच चालू शकत नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले. इमानची प्रकृती स्थिर नाही. इजिप्तला नेल्यानंतर तिला काही झाल्यास जबाबदारी कोणाची? असा प्रश्नही तिने उपस्थित केला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी इमानचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप देखील तिने केला आहे.

पण, इमानच्या प्रकृतीची डॉक्टरांसह परिचारिका आणि अन्य रुग्णालय कर्मचाऱ्यांनी काळजी घेतली आहे. त्यामुळे आज ती इतकी बरी आहे. सध्या इमान कोणताही आधार न घेता अर्धा तास बसू शकते. मंगळवारी झालेल्या स्पीच थेरपीमध्ये ती चार वाक्ये बोलली. इमानची शस्त्रक्रिया झाल्यावर डॉक्टरांनी तिच्याकडे लक्ष दिले नाही, हे आरोप खोटे आहेत. सध्या ती स्वत: श्वास घेऊ शकते, तिला बाहेरून ऑक्सिजन देण्याची गरज नाही. तसेच सध्या तिला कोणतीही लस दिली जात नाही. अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीला नेहमीच फिजिओथेरपीची आवश्यकता असते. इमान तिच्या लोकांमध्ये राहिली, तर अधिक चांगले होईल आणि येथे उपचार होत नाहीत, तरी तिला इथेच ठेवण्याचा हट्ट तिचे नातेवाईक का करत आहेत? असा प्रश्नही डॉ. लकडावाला यांना उपस्थित केला आहे.

24 एप्रिलला इमानचे वजन करण्यात आले होते. तेव्हा तिचे वजन 171 किलो इतके झाले होते. आपण बेरिअॅट्रिक सर्जन आहोत, न्यूरोलॉजिस्ट नाही, असेही डॉ. लकडावाला यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या