Advertisement

फायबरच्या झाकणाने घेतला अमरापूरकरांचा जीव?


फायबरच्या झाकणाने घेतला अमरापूरकरांचा जीव?
SHARES

डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या दुर्देवी मृत्यूनंतर संपूर्ण मुंबईच हादरुन गेली असून हे प्रकरण मुंबई महापालिकेला चांगलेच शेकण्याची शक्यता आहे. रस्त्यांवरील मॅनहोल्सचे झाकण हे महापालिकेच्या कामगारांशिवाय कोणीच उघडू शकत नाही. ते उघडल्यानंतर त्याठिकाणी कामगार स्वत: किंवा बांबूला लाल कपडा लावून धोक्याची सूचना देत असतो. परंतु, अमरापुरकर यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले ते गटाराचे झाकण फायबरचे असावे आणि पावसात पाण्याच्या प्रवाहामुळे ते निखळून वाहून गेले असावे अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.


न्यायालयात याचिका

डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या दुर्दैवी मृत्यूला जाबाबदार असणाऱ्या प्रशासनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यात पालिका प्रशासनाकडून ५० लाखांची नुकसान भरपाई वसूल करावी, तसेच दोषी अधिकऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेला अमरापूरकर मृत्यू प्रकरण चांगलेच भोवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


अतिरिक्त आयुक्तांची चौकशी समिती

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांची समिती नियुक्त केली आहे. एम. एस. मटकर मार्गावरील मॅनहोल्समध्ये पडून दुर्देवी घटना घडली आहे. या मार्गावरील पाण्याचा त्वरीत निचरा व्हावा, या उद्देशाने  मॅनहोल्स कुणीतरी उघडले होते. त्यामध्ये पडून डॉ. अमरापूरकर यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची तपशीलवार माहिती, दुर्घटनेची कारणमीमांसा, पुढील कारवाई तसेच अशा घटना घडू नयेत म्हणून काय उपाययोजना कराव्यात? यासाठी ही चौकशी समिती गठीत केली असून पुढील १५ दिवसांमध्ये अहवाल देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.


लोखंडी ट्रायपॉड गेले कुठे?

पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी अनेकदा महापालिकेच्या वतीने मॅनहोल्सची झाकणे उघडली जातात. यापूर्वी अशा प्रकारचे लोखंडी ट्रायपॉड लावले जायचे. ते आजही लावले जात असून विभाग कार्यालयांमध्ये ते उपलब्ध असल्याचेही महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कोणत्याही मॅनहोल्सचे झाकण हे कुणालाही उघडता येत नाही. ते उघडण्याची वेगळी पद्धत असते. त्यामुळे जर पालिका अधिकाऱ्यांनी ते उघडले, तर ते स्वत: त्या जागी थांबणार किंवा लोखंडी ट्रायपॉड लावणार, आणि तेही नसले तर बांबूला कपडा बांधून अकडवणार, असे महापालिकेच्या मलनि:स्सारण विभागाच्या काही निवृत्त अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


लोखंडाची चोरी म्हणून फायबरची झाकणे

मुंबईत गटाराच्या मॅनहोल्सला लावलेली लोखंडी झाकणे ही यापूर्वी गर्दुल्ल्यांकडून चोरी होत होती. त्यामुळे बऱ्याचदा मॅनहोल्स उघडे राहून दुर्देवी प्रकार घडले आहेत. त्यामुळे या लोखंडी मॅनहोल्सच्या झाकणाऐवजी फायबरची झाकणे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबरचीच झाकणे बसवण्यात आली आहेत.


फायबरची झाकणे पोकळ

फायबरची झाकणे ही आतल्या बाजूने पोकळ असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात ती वर उचलली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच ते झाकण कदाचित निखळून गेले असेल. परंतु, कोणताही महापालिकेचा कर्मचारी एवढा निष्काळजीपणा करणार नाही, असेही महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


3756 मिमी पाण्याचा निचरा मलवाहिनीद्वारे

मलनि:स्सारण वाहिन्यांच्या 50 पंपिंग स्टेशनच्या ठिकाणी लावलेले 110 पंप सुरू करण्यात आले. त्यामुळे मलवाहिन्यांतून दिवसाला 1700 मि. मी. पाणी वाहून नेले जाते. त्या तुलनेत 3756 मि. मी. एवढे पाणी वाहून नेऊन पाण्याचा निचरा केल्याचे महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे जर ३० हजार कामगारांनी रस्त्यावर उतरून पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न केला, तर मग एलफिन्स्टन रोडवरील मटकर मार्गावर कामगार कसे नव्हते? असा प्रश्न विचारला जात आहे.


आकडेवारी काय सांगते?

  • 67,707 - एकूण मॅनहोल्स
  • 1915  कि.मी. - मलनि:स्सारण वाहिनींचे नेटवर्क
  • 1700 मिलियन लिटर - पंपिंग स्टेशनद्वारे पाण्याचा मलजलाचा निचरा



हेही वाचा

एका मुंबईकराचं मुंबईकरांसाठी खुलं पत्र!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा