SHARE

चेंबूरच्या टिळक नगर परिसरातील सरगम सोसायटी या १५ मजली इमारतीला आग लागून त्यात ५ जणांचा मृत्यू, तर दोन अग्निशमन जवान जखमी झाल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. या दुर्घटनेत जोशी कुटुंबातील तिघेजण आणि गंगर कुटुंबातील २ जणांचा समावेश आहे.


यांचा समावेश

सुनीता जोशी (७२), भालचंद्र जोशी (७२), सुमन श्रीनिवास जोशी (८३), सरला गंगर (५२), लक्ष्मीबेन गंगर (८३) अशी मृतांची नावे आहेत. तर छगन सिंग (२८) आणि श्रीनिवास जोशी (८६) यांना धुराचा त्रास झाल्याने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


कशी घडली घटना

रात्री ८ वाजेच्या सुमारास सरगम सोसायटीच्या १४ व्या मजल्यावर ही आग लागली. घरातील सिलिंडर आणि एसीचा स्फोट होऊन ही आग अधिकच भडकली. ही आग काही वेळातच अकराव्या मजल्यापर्यंत पोहोचली. या आगीत दोन घरातील कुटुंब अडकल्याने तात्काळ अग्निशमन दलाला कळवण्यात आलं.


सिलिंडरचा स्फोट

या घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन्ही मजल्यांवर अडकलेल्या ९ रहिवाशांना सुखरूप बाहेर काढलं. परंतु ५ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर एका रहिवाशासह २ जवानांना धुराचा त्रास झाल्याने त्यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


संबंधित विषय
ताज्या बातम्या