मुंबई (mumbai) उत्तर मतदारसंघातील भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी (gopal shetty) यांनी आज (सोमवार) बोरिवली (borivali) मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली. भारतीय जनता पक्षाने त्यांना राज्य विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट नाकारल्यानंतर गेल्या बुधवारी गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
गोपाळ शेट्टी यांनी संजय उपाध्याय यांना बोरिवली मतदारसंघातून उमेदवारी देण्याच्या पक्षाच्या निर्णयावर उघडपणे टीका केली होती. मात्र आता निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दिलेल्या अंतिम मुदतीच्या शेवटच्या दिवशी गोपाळ शेट्टी यांनी माघार घेत असल्याची घोषणा केली आहे.
राज्य युनिट प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी “गोपाळ शेट्टी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील आणि महायुतीला पाठिंबा देतील” असा विश्वास व्यक्त केला होता. हा अर्ज मागे घेण्याचा निर्णय या वक्तव्याच्या एका दिवसानंतर घेतला गेला आहे. यामुळे गोपाळ शेट्टींचा आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय चर्चेचा मुद्दा ठरला आहे.
मात्र, अट्टल बंडखोरांचा उल्लेख करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या जनादेशाचा अवमान करणाऱ्यांना पक्षाचे दरवाजे बंद केले जातील, असा इशाराही दिला आहे.
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा (सोमवार) शेवटचा दिवस असल्याने दिवसाअखेरीस सर्वच मतदारसंघात निवडणुकीच्या (election) रणधुमाळीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा