Advertisement

कोठारी मॅन्शनच्या मालकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा


कोठारी मॅन्शनच्या मालकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसजवळील जीपीओसमोरील धोकादायक आणि रिकामी असलेल्या कोठारी मॅन्शन इमारतीला लागलेली आग विझवतानाच त्या इमारतीचा एक भाग कोसळला. या इमारतीला म्हाडानं यापूर्वीच दुरुस्तीची परवानगी दिली होती. परंतु मालकानं केवळ टेकू लावण्यापलीकडे इमारतीची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे आग विझवताना झालेल्या अग्निशमन दलाच्या वाहनांचे नुकसान आणि जवानांना झालेली दुखापत, यामुळे याप्रकरणी महापालिकेच्याकडून मालकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा पोलीस ठाण्यात नोंदवला आहे.


कोठारी मॅन्शन कोसळली

जीपीओसमोरील कोठारी इमारतीला शनिवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. मात्र, ही आग विझवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान करत असतानाच या इमारतीचा दक्षिण बाजूस असलेला भाग कोसळला. हा भाग अग्निशमन दलाच्या दोन वाहनांवर पडून त्यांचे नुकसान झाले. तर जवान सुहास माने आणि लॅडरचालक सुधीर देवळेकर जखमी झाले होते. या दोघांवर वैद्यकीय उपचार केल्यानंतर त्यांना रविवारी सकाळी सोडून देण्यात आलं.


४२ मीटर लॅडरचे नुकसान

इमारतीचा जो भाग कोसळला त्यात ४२ मीटर उंचीच्या एरियल लॅडर प्लॅटफॉर्मचे नुकसान झाले. याशिवाय एक फायर इंजिनचंही नुकसान झालं आहे. महापालिकेकडे सध्या ४२ मीटर उंचीच्या एकूण चार एरियल लॅडर आहेत. नरिमन पॉईँट येथील या ४२ मीटर लॅडरचे मोठे नुकसान झाले आहे. १९९८ मध्ये ही लॅडर खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर २०१५ मध्ये या लॅडरची दुरुस्ती करण्यात आली होती. फिनलँडमध्ये बनवण्यात आलेल्या एरियल लॅडरची सेवा मागील २० वर्षांपासून घेतली जात आहे.


फिनलँडच्या अभियंत्यांना पाचारण

याबाबत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी याबाबत फिनलँडमधील संबंधित कंपनीच्या अभियंत्यांना पाठवून या लॅडरची तपासणी करण्यास सांगितलं आहे. या कंपनीच्या अभियंत्यांनी तपासणी केल्यानंतर जर दुरुस्ती करण्याचा उपाय सूचवला तर त्याची दुरुस्ती केली जाईल. परंतु दुरुस्तीचा खर्च अधिक असल्यास आणि नवीन लॅडर विकत घेतले जाईल. फायर इंजिन हे दुरुस्त होण्यासारखं असून ते दुरुस्त केलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.


दुरुस्तीसाठी होती परवानगी...

ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोठारी इमारतीच्या मालकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला असल्याचं सांगितलं आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारितील ही इमारत आहे. ती अत्यंत धोकादायक असल्यानं चार वर्षांपूर्वीच रिकामी करण्यात आली होती. त्यानंतर ही इमारत दुरुस्ती करण्यासाठी म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाने मालक, भाडेकरूंना परवानगी दिली होती.


म्हणून नोंदवला पोलीस ठाण्यात गुन्हा

या इमारतीला केवळ टेकू लावून ठेवण्यात आले होते. परंतु चार वर्षांत मालक तथा भाडेकरूंनी कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. त्यामुळेच या इमारतीला लागलेली आग विझवताना काही भाग कोसळून अग्निशमन दलाच्या ४२ मीटर लॅडरचे तसेच फायर इंजिनचे नुकसान झाले. दोन जवानांना दुखापत झाली. त्यामुळे या इमारतीची दुरुस्ती न करता लोकांच्या जिवीतास धोका निर्माण केल्यामुळे तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांचे नुकसान व जवानांना झालेली दुखापत यामुळे या इमारतीच्या मालक तथा भाडेकरूंविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आल्याची माहिती किरण दिघावकर यांनी दिली.


हेही वाचा -

फोर्टमधील कोठारी मेन्शनला आग, इमारतीचा भागही कोसळला

काळवीट प्रकरणातला सलमानचा बेपत्ता 'देवदूत' कोण?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा