काळवीट प्रकरणातला सलमानचा बेपत्ता 'देवदूत' कोण?


काळवीट प्रकरणातला सलमानचा बेपत्ता 'देवदूत' कोण?
SHARES

काळवीट प्रकरणातील महत्वाचा आरोपी दिनेश गावरे मागील २० वर्षांपासून बेपत्ता असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे. गावरे एकेकाळी सलमान खानचा स्वीय सहाय्यक होता. तो या खटल्यात जामिनावर सुटल्यापासून बेपत्ता असल्याचं म्हटलं जात आहे. गावरे मुंबईत रहात असला, तरी 'मुंबई लाइव्ह'ने त्याच्या घरच्या पत्त्यावर शोध घेतला असता, या नावाची कुठलीही व्यक्ती तिथं रहात नसल्याचं पुढं आलं आहे. 

वांद्र्यातील हिट अॅण्ड रन प्रकरणात सलमानमानचे रक्ताचे नमुने रुग्णालयात नेणारा पोलिस शिपाई ज्या पद्धतीने बेपत्ता झाला. तसाच प्रकार गावरेच्या बाबतीत तर झाला नाही ना? या तर्कविर्तकांमुळे चर्चांना उधाण आलं आहे.  


'असा' अडकला पोलिसांच्या तावडीत

राजस्थानच्या कणकणी इथं १९९८ मध्ये 'हम साथ साथ है' या चित्रपटाचं शुटींग सुरू होतं. त्यावेळी अभिनेता सलमान खान, सैफअली खान, निलम कोठारी, तब्बू, सोनाली बेंद्रे यांच्यासह सलमानचा स्वीय सहाय्यक दिनेश गावरे आणि मार्गदर्शक दुश्यत सिंग १ ऑक्टोबर १९९८ साली कणकणीच्या जंगलात काळवीटाच्या शिकारासाठी गेले होते. त्यावेळी सलमानला काळवीटांची शिकार करण्यासाठी इतर आरोपींनी प्रोत्साहीत केल्याचं म्हटलं जातं. स्थानिकांनी गोळीचा आवाज ऐकून पाठलाग करत सलमानसह इतरांना रंगेहाथ पकडलं. या प्रकरणी वन विभागाकडे गुन्हा नोंदवण्यात आला.


सलमानला कोणी दिली बंदूक?

या प्रकरणात सलमान गाडी चालवत काळवीटाचा पाठलाग करत होता. तर शिकार करताना सलमानला दिनेश गावरेने बंदूक दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या घटनेच्या एका आठवड्यानंतर म्हणजेच ८ ऑक्टोबर १९९८ साली सलमानने ती बंदूक दिनेशला देत विमानाने मुंबईला नेण्यास सांगितल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. काळवीट प्रकरणात दिनेश मुख्य आरोपी असल्याने पोलिस त्याच्या शोधात आहेत. मात्र सलमानने दिनेश पोलिसांच्या हाती लागण्याआधीच त्याला पळवून लावलं. त्या दिवसापासून ते आजतागायत पोलिस दिनेशचा शोधच घेत आहेत. 


पण त्याचा पत्ताच नाही

पोलिस चौकशीत दिनेश वांद्र्याच्या नूरकी चाळ बेहरामपाडा इथं एकटा रहात असल्याचं समजलं. ही वस्तुस्थिती पडताळण्यासाठी 'मुंबई लाइव्ह' ने वांद्रे येथील दिनेशच्या घराचा पत्ता शोधला, असता तिथं दिनेश गावरे नावाचं कुणीही व्यक्ती रहात नसल्याचं स्थानिक रहिवासी महोम्मद जमशेद (४५) आणि शाकीर शेख (४७) यांनी सांगितलं. हे दोघेही या ठिकाणी लहानाचे मोठे झाले आहेत. मात्र अशा कोणत्याही व्यक्तीची खोली इथं नसल्याचं तसंच या नावाची कुठलीही व्यक्त इथं भाड्याने राहात नसल्याची माहिती त्यांनी दिली.


'तो' सापडलाच नाही

या प्रकरणी कणकणी येथील तत्कालीन वन अधिकारी आणि तपास अधिकरी ललित कुमार बोडा यांच्याशी संपर्क साधला असता. ते म्हणाले ''१९९९ मध्ये या प्रकरणाच्या तपासासाठी आणि दिनेशचा शोध घेण्यासाठी आम्ही ४ दिवस मुंबईत होतो. मुंबई पोलिसांच्या मदतीने मी दिनेशला शोधण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र आमची मेहनत वाया गेली. दिनेश काही सापडलाच नाही''. दिनेश जर पोलिसांच्या हाती लागला, तर काळवीट प्रकरणाला नक्कीच कलाटणी मिळू शकते. पण या घटनाक्रमातील महत्त्वाचा दूवाच बेपत्ता असल्याने सलमानसाठी एकप्रकारे हा अदृष्य देवदूतच ठरला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.



हेही वाचा-  

सलमानला देशाबाहेर जायलाही परवानगी; न्यायालयाने दिली मुभा



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा