Advertisement

महाबळेश्वरच्या पर्यटन विकासासाठी 'इतका' निधी मंजूर

महाबळेश्वरमध्ये पर्यटकांच्या सोईसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारण्याकरीता ३३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

महाबळेश्वरच्या पर्यटन विकासासाठी 'इतका' निधी मंजूर
SHARES

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनाच्या ठिकाणांपैकी एक मानलं जातं. दरवर्षी लाखो पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात. या पर्यटकांच्या सोईसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारण्याकरीता ३३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत हा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून तातडीने विकासकामे सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. कामे पूर्ण झाल्यानंतर महाबळेश्वरचं सौंदर्य अधिक खुलेल आणि पर्यटनवाढीला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

या निधीतून महाबळेश्वर बाजारपेठेतील रस्ते आणि गल्ल्यांचा सिमला, मनालीतील ‘मॉल रोड’च्या धर्तीवर विकास करण्यात येईल, महाबळेश्वरमधल्या ऐतिहासिक इमारतींचं पुरातन सौंदर्य कायम ठेवून सुशोभीकरण करण्यात येईल तसंच रस्त्यांवरील वीजवाहिन्या भूमीअंतर्गत करण्याची कामे करण्यात येतील.

हेही वाचा- अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धनला ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीला राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray), सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तामामा भरणे, आमदार मकरंद पाटील, बाळासाहेब भिलारे आदींसह स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

महाबळेश्वर शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांची ‘मॉल रोड’च्या धर्तीवर सुधारणा करताना हे रस्ते रुंद करण्यात येतील. त्यांची रंगसंगती आणि नामफलक एकाच पद्धतीचे असतील. वीजवाहिन्या भूमीअंतर्गत करण्यात येतील. पार्किंगची स्वतंत्र सोय करण्यात येईल. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रात्रीच्या वेळेस दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात येईल. शहरातील ऐतिहासिक पेटीट लायब्ररीचं नूतनीकरण करण्यात येईल, यासंदर्भात करावयाच्या विविध विकासकामांचे सादरीकरण या बैठकीत करण्यात आलं. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाबळेश्वरच्या विकासासाठी ३३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मकरंद पाटील आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी समाधान व्यक्त केलं.

(fund allocated for tourism development in mahabaleshwar)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा