कचरा कुंडी नसल्यास दुकानदार, फेरीवाल्यांचा परवाना रद्द !

  Mumbai
  कचरा कुंडी नसल्यास दुकानदार, फेरीवाल्यांचा परवाना रद्द !
  मुंबई  -  

  मुंबईतील ज्या व्यावसायिकांकडे तसेच अधिकृत फेरीवाल्यांकडे कचरा निर्माण होतो, त्यांना महापालिकेने स्वतंत्र कचराकुंडी ठेवणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे ज्या विक्रेत्यांकडे कचराकुंडी नसेल, त्यांचा परवानाच रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 

  महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत महापालिका अधिकाऱ्यांना आदेश दिले असून प्रत्येक दुकान आणि परवाधारक फेरीवाल्यांच्या ठिकाणी अचानक धाडी मारुन हे अधिकारी कचरापेट्या तपासणार आहेत.


  दररोज ११०० मेट्रीक टन कचरा झाला कमी

  कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी योग्यप्रकारे नियोजन केले जात असल्यामुळे दैनंदिन कचऱ्याच्या प्रमाणात घट झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे. गेल्यावर्षी दररोज सरासरी ९ हजार मेट्रीक टन कचरा उचलला जात होता. परंतु आता दैनंदिन कचरा सरासरी ७ हजार ९०० मेट्रीक टन एवढा झाला आहे. त्यामुळे दैनंदिन  कचऱ्याच्या प्रमाणात सरासरी ११०० मेट्रीक टनाची घट झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे.


  १२ ठिकाणी सुरु करणार कचरा वर्गीकरण केंद्र

  या दैनंदिन कचऱ्याचे प्रमाण अजून कमी करण्यासाठी महापालिका चालू आर्थिक वर्षात १२ ठिकाणी कचरा वर्गीकरण केंद्र सुरु करणार आहे. विकास नियोजन आराखड्यात राखीव असलेले १२ भूखंड महापालिकेच्या ताब्यात आले असून यावर कचरा वर्गीकरण केंद्रे उभारली जाणार आहेत. 

  सद्यस्थितीत ३८ कचरा वर्गीकरण केंद्र अस्तित्वात आहेत. नव्याने सुरु होणाऱ्या १२ केंद्रामुळे महापालिकेच्या कचरा वर्गीकरण केंद्रांची संख्या ५० वर जाईल. यामुळे दररोजच्या कचऱ्यात ६०० मेट्रीक टन कचऱ्याची घट होईल, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.


  ३,०८४ गृहनिर्माण संस्थांना नोटीस

  आतापर्यंत ३ हजार ८४ गृहनिर्माण संकुलांना नोटीस देण्यात आल्या आहेत. या संकुलांमधून दररोज सुमारे १ हजार ३४५ मेट्रीक टन एवढा कचरा गोळा करण्यात येत आहे. मात्र २ ऑक्टोबर २०१७ पासून संबंधित संकुलांमधील कचरा संकलन कमी होणार असल्याने महापालिकेच्या एकूण दैनंदिन कचरा संकलनात घट होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. 

  एकूणच महापालिकेच्या दैनंदिन कचरा संकलनामध्ये एकूण ३ हजार ४५ टन एवढ्या प्रमाणात घट अपेक्षित असून त्यापैकी ११०० मेट्रीक टनाची घट झाली आहे. यापैकी दररोज ११०० मेट्रीक टनांची घट महापालिका प्रशासनाने यापूर्वीच साध्य केली आहे. या सर्व उपाययोजनांमुळे महापालिकेच्या कचरा वहन खर्चामध्ये साधारणपणे २५ टक्क्यांची घट होईल, असाही विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.  हे देखील वाचा -

  कचराऱ्याची विल्हेवाट लावा, नाहीतर गुन्हा दाखल होईल!  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.