Advertisement

आता पालिका कचरा उचलणार नाही..तुम्ही काय कराल?


आता पालिका कचरा उचलणार नाही..तुम्ही काय कराल?
SHARES

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरातून गोळा होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येने गंभीर स्वरुप धारण केले आहे. देवनार डंपिंग ग्राऊंड, मुलुंड डंपिंग ग्राऊंड ही त्याचीच उदाहरणं म्हणावी लागतील. मात्र त्यावर मुंबई महापालिकेनं जालीम तोडगा शोधून काढला आहे. हा तोडगा जालीम म्हणावा लागेल मुंबईतल्या मोठ्या सोसायट्यांसाठी. कारण येत्या 2 ऑक्टोबरपासून मुंबईतल्या मोठ्या सोसायट्यांमधून कचरा न उचलण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.


काय आहे निर्णय?

मुंबईतल्या मोठ्या सोसायट्यांमधला कचरा पालिका गोळा करणार नसून या सोसायट्यांनीच आपल्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची आहे. या कचऱ्यापासून सोसायट्यांनी खत निर्मिती करायची असून याचं विशेष प्रशिक्षण या सोसायट्यांना दिलं जाणार आहे. तर छोट्या सोसायट्या आणि परिसरातून फक्त पालिकेकडून कचरा गोळा केला जाणार आहे. मात्र हा कचरा ओला आणि सुका असा वेगळा करुन दिला तरच गोळा केला जाणार आहे.

शून्य कचरा प्रदर्शन

पालिकेच्या या निर्णयामुळे मुंबकरांमध्ये नाराजी वाढणार असली, तरी यावरही पालिकेने उपाय शोधला आहे. कचऱ्यापासून कमी वेळेत खतनिर्मिती कशी करायची याचं विशेष प्रशिक्षण या सोसायट्यांना दिलं जाणार आहे. यासाठी अंधेरीतील पालिकेच्या के पूर्व कार्यालयाकडून 21 ते 23 जुलैदरम्यान प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत आहे. 'शून्य कचरा प्रदर्शन' असे या प्रदर्शनाचे नाव असून सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे प्रदर्शन मुंबईकरांसाठी खुलं राहणार आहे.


देवनार डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. त्यामुळेच पालिका आयुक्तांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे कचऱ्यापासून खतनिर्मितीची प्रक्रिया लोकांना समजावी म्हणून हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.

देवेंद्रकुमार जैन, सहायक आयुक्त, पालिका के पूर्व विभाग

काय आहे प्रदर्शनात?

या प्रदर्शनात एकूण 44 स्टॉल आहेत. विशेष म्हणजे ज्या सोसायट्या स्वत: कचऱ्याची विल्हेवाट लावतात, अशा सोसायट्यांची उदाहरणंही इथे दिली जात आहेत. यामध्ये ब्लॉसम सोसायटी, देवांगिनी सोसायटी, स्वच्छ पार्ले अभियान आणि विजय नगर या सोसायट्यांचा समावेश आहे.

कचऱ्यापासून खतनिर्मिती आणि कचरा नियोजनासाठी उपयुक्त अशी अनेक उपकरणं या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. अवघ्या काही तासांमध्ये खत तयार होऊन वापरण्यासाठी उपलब्ध होऊ शकणाऱ्या उपकरणांचा समावेश या प्रदर्शनात आहे.


घरच्या घरीसुद्धा कचऱ्याची विल्हेवाट लावणं शक्य आहे. आपल्या पारंपरिक पद्धती जरी वेळखाऊ असल्या, तरी त्यापासून तयार झालेलं खत हे चांगल्या दर्जाचं असतं.

डॉ. वाणी कुळहळ्ळी, सदस्या, स्वच्छ पार्ले अभियान

गेल्या काही दिवसांपासून आरजे मलिष्काच्या 'मुंबई..तुला बीएमसीवर भरोसा नाय काय' या गाण्यामुळे मुंबई महापालिकेच्या कारभारावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. या गाण्यात मांडलेल्या समस्या किंवा मुद्द्यांमध्ये तथ्य असले, तरी यामुळे पालिकेकडून होत असलेल्या चांगल्या उपक्रमांकडे दुर्लक्ष न होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. 'शून्य कचरा प्रदर्शन' हा त्यातलाच एक उपक्रम म्हणावा लागेल.


हेही वाचा

'कचरा घोटाळ्याची चौकशी अतिरिक्त आयुक्तांमार्फतच व्हावी'

वरळीच्या शिवालय सोसायटीत कचऱ्यापासून खत निर्मिती

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा