Advertisement

यांनी करुन दाखवलं..आपण का नाही?


यांनी करुन दाखवलं..आपण का नाही?
SHARES

मुंबई 100 टक्के कचरामुक्त होऊ शकते! आत्ताच्या घडीला ही अतिशयोक्ती वाटणं साहजिक आहे. पण याची सुरुवात मुंबईतच एका सोसायटीनं करुन दाखवली आहे. अंधेरीच्या विजयनगर सोसायटीनं 100 टक्के कचरामुक्तीचं ध्येय गाठलं. आणि हे सर्व सोसायटीतल्याच रहिवाशांच्या मदतीने! त्यामुळे 100 टक्के कचरामुक्त मुंबईच्या स्वप्नासाठी विजयनगर सोसायटीनं प्रत्यक्षात उतरवलेल्या स्वप्नाचा दाखला घ्यावाच लागेल!



विजयनगर सोसायटी

एकूण इमारती - 6

एकूण घरं - 518

अंदाजे लोकसंख्या - 2000

दिवसाला जमा होणारा ओला कचरा - 130 किलो

दिवसाला जमा होणारा सुका कचरा - 150 किलो

दिवसाला जमा होणारा एकूण कचरा - 280 किलो

वर्षाला जमा होणारा एकूण कचरा - 1 लाख 2 हजार 200 किलो


विजयनगर सोसायटीमध्ये दररोज अंदाजे 280 किलो कचरा जमा होतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर जमा होणारा कचरा महापालिकेला देण्यासाठी आणि पालिकेला त्यावर प्रक्रिया करण्यासाठी बराच वेळ आणि मनुष्यबळ खर्ची पडत असे. तसेच, या सर्व प्रक्रियेमध्ये पर्यावरणाची हानी होतच होती. यावरच तोडगा काढण्यासाठी सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येऊन कचऱ्याचं नियोजन करण्याचा निर्णय घेतला.


कसा राबवला प्रकल्प?

26 जानेवारी 2015 पासून सोसायटीनं कचरा प्रकल्पाला सुरुवात केली. यामध्ये ओल्या कचऱ्यापासून खत बनवलं जातं. सुक्या कचऱ्याचं इ-वेस्ट, प्लॅस्टिक वेस्ट आणि बायो-मेडिकल वेस्ट अशा प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं आणि संबंधित यंत्रणांकडे हा कचरा सोपवला जातो. हे सर्व व्यवस्थापन करण्यासाठी सोसायटीकडून स्त्रीमुक्ती संघटनेच्या तीन महिला सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यासाठी त्यांना दर महिन्याला निर्धारित मानधनही देण्यात येतं.


विजय नगर सोसायटी पूर्णपणे झिरो गार्बेज सोसायटी झाली आहे. सोसायटीतल्या रहिवाशांच्या सक्रिय सहभागामुळे शक्य झालं. भाभाचे माजी कर्मचारी असलेले विजय काळे यांनी वास येणाऱ्या कचऱ्याची दुर्गंधी दूर करण्यासाठी एक खास एन्झाईम वापरल्यामुळे दुर्गंधीची समस्याही दूर झाली.

वर्षा बापट, प्रमुख, कचरा समिती

विजय नगरच्या या उपक्रमासाठी वेगवेगळ्या स्तरावरुन कौतुकाची थाप मिळत आहे. हा प्रकल्प लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विजयनगर झिरो गार्बेज या सोसायटीच्या फेसबुक पेजचीही मोठी मदत झाली.


मुंबईला वाचवायचं असेल, तर कचऱ्याचं नियोजन केलंच पाहिजे. एकट्या विजयनगर सोसायटीमधून वर्षाला एक लाख किलो अर्थात 100 टन कचरा निघत असेल, तर विचार करा आख्ख्या मुंबईतून किती गोळा होत असेल. त्यामुळे कचऱ्याचं नियोजन करणं ही काळाची गरज आहे. सिटी फार्मिंग, होम कंपोस्टिंगसारखे प्रयोग घरोघरी राबवायला हवेत.

कौमुदी टायटस पासन्हा, सदस्या, कचरा प्रकल्प समिती

कौमुदी पासन्हा यांनी सिटी फार्मिंगसारखे प्रकल्प लोकांपर्यं पोहोचवण्यासाठी सिटी फार्मर नावाचं एक फेसबुक पेजही तयार केलं आहे. त्याद्वारे घराघरात होऊ शकणारं वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन याविषयी वेगवेगळे प्रकार सांगितले जातात.


भावी पिढीलाही पर्यावरण प्रेमाचा वारसा!

फक्त इतक्यावरच न थांबता पुढच्या पिढीवरही पर्यावरण प्रेमाचे संस्कार व्हावेत यासाठी सोसायटीकडून प्रयत्न केले जात आहेत. लहान मुलांकडूनही इथे वृक्षारोपण करुन घेतले जाते. यामध्ये खाल्लेल्या फळांच्या बिया फेकून न देता, परिसरातच त्या लावल्या जातात. शिवाय सोसायटीच्या कचरा प्रकल्पामध्ये तयार झालेलं खत या रोपांसाठी वापरलं जातं.

मुंबईचे खड्डे, रस्त्यांवरचं ट्रॅफिक, विकासाच्या नावाखाली अक्षरश: ओरबाडली जाणारी वनसंपत्ती आणि दिवसेंदिवस वाढत जाणारं प्रदूषण...अशा अनेक गोष्टींसाठी मुंबईकर रोज एक तर सरकारला, पालिका यंत्रणेला किंवा राजकीय नेत्यांना जबाबदार धरत असतात. मात्र, या सर्व जबाबदार यंत्रणांमध्ये एक जबाबदार घटक म्हणून मुंबईकरांनीही आपली भूमिका निभावली, तर 100 टक्के कचरामुक्त मुंबई नक्कीच शक्य आहे!



हेही वाचा

मुंबईत होऊ शकते महापुराची पुनरावृत्ती!

कशी झाली आयसी कॉलनी चकाचक?


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा