Advertisement

कांदिवलीत सिलेंडरचा स्फोट, भीषण आगीत ९ जण होरपळले

आगीच्या घटनेत ९ जण जखमी

कांदिवलीत सिलेंडरचा स्फोट, भीषण आगीत ९ जण होरपळले
SHARES

मुंबईच्या कांदिवली परिसरात मंगळवारी संभाजी नगर येथील जानुपाडा गवारेचाळीत सिलेंडर गॅसचा स्फोट झाला. या दुर्घटनेत ९ जण गंभीर जखमी झाले असून  त्यांच्यावर कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आगीत गवारे चाळीतील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. रात्री उशिरपर्यंत अग्निशमन दलाचे जवान ही आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. तर वांद्रे येथील आगीत ६ जण भाजले आहेत. 

कांदिवलीच्या संभाजीनगर परिसरातील गवारे चाळीत राहणाऱ्या संदीप कानडे यांच्या  घरी ही दुर्घटना घडली. संदीप हे त्यांची पत्नी शारदा आणि कुटुंबियांसोबत घरात असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. ही दुर्घटना इतकी मोठी होती की, सिलेंडर स्फोटा आजूबाजूच्या चार खोल्यांतील रहिवाशीही त्यात गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दल आणि पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच घटनास्थळीदाखल झालेल्या अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. एका मागोमाग एक चार सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात फोफावरत होती. रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळण्यात अग्निशमन दलाला यश आले.  

या आगीत  शारदा नामदेव कानडे (५६), संदीप नामदेव कानडे  (३१)ओंकार दत्तात्रय चीके (१८) मेहुल सूरती (३०)जयेश सुतार (३०) दिवेश पटेल(२२) राजेश रणछोड दुबला (४०)निशांत तुषार पांचाळ (११) दिव्यानि सुरती(४७) जखमी झाले असून त्यांच्यावर कांदिवलीच्या शताब्दी रुग्मालयात उपचारासाठी दाखल केले आहेत. 


वांद्रेत घराला लागलेल्या आगीत ६ जण जखमी

वांद्रे पूर्व येथील महाराष्ट्र नगरमध्ये असलेल्या एका घराला आग लागून सहा जण जखमी झाले आहेत. या जखमींना पालिकेच्या सायन आणि भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र नगरमधील एका घराला बुधवारी सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान आग लागली. या आगीत नगमा बानू (४५) या ३५ ते ४० टक्के, नसरीन बानू ( ३०) या २० ते २५ टक्के, सकरिन बानू ( १८) या १५ ते २० टक्के भाजल्या आहेत. या तिघींना पालिकेच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, नाझिया शेख ( २२) या १० टक्के आलिया शेख ( ४) ही २ ते ५ टक्के, अयान शेख ( ६) हा ४ ते ५ टक्के भाजला आहे. या तिघांवर पालिकेच्या भाभा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. तर, पुढील चौकशी स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाकडून केली जात आहे.




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा