Advertisement

तळीराम खुश! महामार्गालगतच्या बार, मद्य दुकानांचं शटर पुन्हा उघडणार


तळीराम खुश! महामार्गालगतच्या बार, मद्य दुकानांचं शटर पुन्हा उघडणार
SHARES

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील ५०० मीटरच्या अंतरावरील बार, मद्य दुकानांचं १ एप्रिल २०१७ पासून शटर डाऊन होतं. त्यामुळं तळीरामांची थोडी-फार अडचण होत होती. पण आता मात्र लवकरच या बार-मद्य दुकानांचं शटर उघडणार असून तळीराम या बातमीने चांगलेच खुश होणार यात काही शंका नाही. कारण आता राज्य सरकारनं ग्रामपंचायत क्षेत्रातील पाच हजार लोकसंख्येची अट तीन हजार लोकसंख्या करत मद्य विक्री परवान्यांच्या नुतनीकरणास परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींमधील बार आणि मद्य दुकानं पुन्हा सुरू होणार आहेत.


महसुलात मोठी घट 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १६ डिसेंबर २०१५ मध्ये राज्य सरकारनं राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतचे बार आणि मद्य दुकानं बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १ एप्रिल २०१७ पासून राज्यभरातील सुमारे ८ हजार मद्य दुकानं, बार-परमिट रूमचं शटर डाऊन झालं.  मात्र, जुलै २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं अटींमध्ये आदेशात बदल करत काही अटींवर महामार्गालगतच्या बार-मद्य दुकानांना परवानगी दिली होती. दरम्यान, महामार्गालगतचे बार-मद्य दुकानं बंद झाल्यानं सरकारच्या महसुलात मोठी घट झाली होती.


परवान्यांचं नुतनीकरण 

सरकारच्या या निर्णयानंतर ग्रामपंचायत स्तरावरून पाच हजार लोकसंख्येची अट शिथिल करण्याच्या मागणीनं जोर धरला. ही मागणी लक्षात घेत अखेर सरकारकडून सन २०११ च्या जनगणनेनुसार ३००० लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील परवाना नूतनीकरणाला परवानग्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे निर्देश राज्य उत्पादन शुल्क आयुक्त तसेच सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता महापालिका हद्दीपासून ३ किमीच्या परिसरातील नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीपासून १ किमीच्या अंतरावर असलेल्या मद्यदुकानांच्या-बारच्या परवान्यांचं नुतनीकरण करण्यात येणार आहे. 


२६०० दुकानं खुलणार

सरकारच्या या निर्णयाचा फायदा ग्रामपंचायत क्षेत्रातील १५०० परमिट रूम,  ४०० देशी दारूची दुकानं तसंच ७०० बीअर बारला होणार आहे. बंद झालेली ही सर्व २६०० दुकानं आता पुन्हा खुली होणार असून तळीरामांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा