Advertisement

पोलिसांची माणुसकी, दुर्घटनेत मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबाला केली मदत


पोलिसांची माणुसकी, दुर्घटनेत मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबाला केली मदत
SHARES

रोज खून, मारामाऱ्या, रक्तपात बघून पोलीस निर्दयी होतात, त्यामुळे त्यांच्यात माणुसकी नसतेच असं म्हटलं जातं. पण काही जण त्याला अपवाद ठरतात. याचीच प्रचिती गोवंडी पोलीस ठाण्यात पाहायला मिळाली.

काही दिवसांपूर्वी चेंबूर येथे झाड पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मृत पावलेल्या महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या कुटुंबियांवर कर्ज काढण्याची वेळ आली. हे गोवंडी पोलिसांना समजताच ते महिलेच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी धावून आले. पोलीस ठाण्यातील सगळ्या पोलिसांनी पुढे येऊन महिलेच्या कुटुंबाला १७ हजार रुपयांची मदत केली आहे.


सर्व पोलिसांनी केली मदत

शारदा घोडेस्वार यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या कुटुंबियांनी १५ हजार रुपयांचं कर्ज काढलं होतं. वृत्तपत्रात ही बातमी वाचताच संपूर्ण गोवंडी पोलिसांनी शारदा यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा निश्चय केला. पोलीस शिपायापासून ते वरिष्ठ पोलीस निरक्षकांपर्यंत सगळ्यांनी आपापल्या परीने मदत केली. बघता बघता १७००० रुपये जमा झाले. शुक्रवारी सकाळी गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने आणि इतरांनी जमा झालेल्या पैशाचा चेक शारदा यांच्या आईंना सुपूर्द केला. यावेळी ६५ वर्षीय कचराबाईंना अश्रू अनावर झाले.


दुर्दैवी अंत

लोकांचं घरकाम करून शारदा घोडेस्वार या आपल्या घराचा गाडा हाकायच्या. शारदा यांच्या घरात त्यांची तीन मुले आणि ६५ वर्षीय आई राहतात. या सगळ्यांची जबादारी ही शारदा यांच्यावरच होती. घराची परिस्थिती अतिशय हालाखीची होती. ७ डिसेंबर रोजी चेंबूरच्या डायमंड गार्डनजवळ त्या बसची वाट बघत बसलेल्या असताना अचानक काळाने घात केला. त्यावेळी शारदा घोडेस्वार यांच्या अंगावर झाड पडले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.


हेही वाचा - 

चेंबूरमध्ये झाड अंगावर पडून महिलेचा मृत्यू

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा