Advertisement

Gulab Cyclonic: महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम

'गुलाब' चक्रीवादळाचं रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्यानं त्याचा मोठा प्रभाव महाराष्ट्राच्या विविध भागांत जाणवत आहे.

Gulab Cyclonic: महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम
SHARES

'गुलाब' चक्रीवादळाचं रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्यानं त्याचा मोठा प्रभाव महाराष्ट्राच्या विविध भागांत जाणवत आहे. वादळाचं रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्यानंतर पावसानं रौद्ररूप धारण करत मंगळवारी मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांबरोबर मुंबई, ठाणे परिसराला झोडपलं. अतिवृष्टीमुळं मराठवाड्यात १०, विदर्भात ५ आणि नाशिकमध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, एनडीआरएफच्या टीमनं ५६० हून अधिक लोकांना सुखरूप बाहेर काढलं.

रविवार आणि सोमवारी झालेल्या पावसामुळं २००हून अधिक जनावरे वाहून गेली आणि अनेक घरांचं नुकसान झाल्याचं समजतं. त्यानंतर आता हवामान विभागानं बुधवारी महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळं वीजांसह, जोरदार वारा आणि गडगडाटी वादळासह वेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

मुंबईतही मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. भारतीय हवामान विभागानं पुढील २४ तासांत मराठवाडा, मुंबई आणि राज्याच्या किनारपट्टी कोकण भागात 'अतिवृष्टी' होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मराठवाड्यामध्ये पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बीड, जालना आणि हिंगोली या ८ जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

गुलाब वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम ठेवला आहे. तसंच, बुधवारी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कमी दाबाच्या क्षेत्रात गेलेल्या गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावाखाली पश्चिमेकडील हालचालीमुळं महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल. कोल्हापूर जिल्ह्यात सोमवार ते मंगळवार सकाळ दरम्यान ४.६ मिमी पाऊस पडला.

पुढील ३ ते ४ तासांत रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत वेगळ्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच, पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांत येत्या ३-४ तासात तीव्र ते अति तीव्र पावसाची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह विजांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा