Advertisement

घाटकोपरनंतर आणखी चार स्टेशन्सवर 1 रुपयांत उपचार सुरू


घाटकोपरनंतर आणखी चार स्टेशन्सवर 1 रुपयांत उपचार सुरू
SHARES

घाटकोपरनंतर मुंबईतील दादर, मुलुंड, कुर्ला आणि वडाळा रोड या चार स्थानकांजवळ एक रुपयांत वैद्यकीय सेवा देणारे चिकित्सालय रविवारी सुरू करण्यात आले आहे. सोमवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या चिकित्सालयाचं उद् घाटन करण्यात आलं. यावेळी आणखी काही स्थानकांवर अशी चिकित्सालयं उभी करणार असल्याचं आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलं. या कार्यक्रमाला शिवसेना खासदार अरविंद सावंत, भाजपा खासदार किरीट सोमय्या, हुसेन दलवाई , खासदार गोपाळ शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वात प्रथम मुंबईतील घाटकोपर पूर्वेला एक रुपयात वैद्यकीय सेवा देणारं पहिलं चिकित्सालय 10 मे पासून सुरू करण्यात आलं. त्यानंतर रविवारपासून लगेचच दादर, मुलुंड, कुर्ला आणि वडाळा रोड या स्थानकांजवळ हे वैद्यकीय चिकित्सालय सुरू करण्यात आलं आहे. आतापर्यंत घाटकोपरच्या चिकित्सालयात जवळपास 800 रुग्णांनी उपचार घेतले आहेत.

वारंवार होणारे अपघात आणि त्यातून जाणारे जीव याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांना तातडीने प्राथमिक उपचार मिळावा यासाठी रेल्वेच्या काही स्टेशन्सवर ही वैद्यकीय चिकित्सालयाची सुविधा दिली जात आहे. सर्वसामान्यांना परवडणारी अशी ही वैद्यकीय सुविधा आहे. सोमवारपासून दादर पूर्वेकडील हनुमान मंदिराच्या शेजारी, मुलुंड पश्चिम आणि कुर्ला पूर्व येथे एका रुपयात वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली आहे. तर वडाळा रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरच हे चिकित्सालय सुरू करण्यात आलं आहे.

याविषयी चिकित्सालय उपक्रमाचे प्रमुख डॉ. राहुल घुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आत्तापर्यंत 800 रुग्णांची तपासणी केल्याचं सांगितलं. तसंच प्रामुख्याने मधुमेह, ब्लडप्रेशर तपासणीसाठी लोकं येतात. कामाच्या गडबडीत आपण आपलं रुटीन चेकअप करणं विसरतो. त्यामुळे स्टेशनला येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी ही एक उत्तम सेवा असल्याचं त्यांनी सांगितलं. या चिकित्सालयाचं खासं वैशिष्ट्य म्हणजे ब्लडप्रेशर, इसीजी अशा प्रकारची तपासणी अगदी काही मिनिटांतच होते. त्यामुळे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांना जास्त वेळ घालवायची गरज नाही. तसंच चिकित्सालयात रक्त तपासणी करणाऱ्यांना दवाखान्यापेक्षा 20 टक्के सवलत आहे. औषधांवर 10 टक्के सूट आहे. चिकित्सालयाच्या बाजूला रेल्वेचंच औषध केंद्र आहे. जिथून तुम्ही औषधं खरेदी करु शकता. तसंच या तपासणीसाठी आलेल्या लोकांची तपासणी करण्यासाठी स्पेशल डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे जेनेरिक म्हणजे स्वस्त दरातील औषधेही उपलब्ध आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा