Advertisement

बाप्पांना निरोप खड्डयांमधूनच!


बाप्पांना निरोप खड्डयांमधूनच!
SHARES

मुंबईत यंदा खड्डे पडणार नाहीत, असे सांगत बाप्पांचे आगमन व विसर्जनही खड्डेविरहीत मार्गावरून होईल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला होता. परंतु मंगळवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने अनेक रस्त्यांचे डांबरी कामच धुवून निघाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे बाप्पांचे आगमन जरी यंदा खड्ड्यांविना झाले असले, तरी निरोप मात्र खड्डयांतल्या रस्त्यांतूनच घ्यावा लागणार आहे!



मुंबईमध्ये पावसाळ्यापूर्वी टप्पा एकमध्ये १०७ रस्ते व टप्पा दोनमध्ये ११० रस्त्यांची कामे हाती घेऊन अनुक्रमे २३  कि.मी. व २० कि.मी. रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे यंदा खड्डेच पडणार नाहीत, असा दावा महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केला होता. तसेच महापालिकेच्या अर्थसंकल्पीय निवेदनामध्येही त्यांनी यंदा कुठेच खड्डे पडले नसल्याचे छाती ठोकून सांगितले होते. मात्र, अजोय मेहता यांचा दावा पावसाने खोटा ठरवला आहे.


पुन्हा उघडली खड्डयांनी तोंडं

मंगळवारी पडलेल्या तुफानी पावसामुळे अनेक रस्त्यांवरचे डांबर, खडी वाहून जात त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी बनवलेले नवीन रस्ते खराब होऊन खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी बुजवलेल्या खड्डयांनी पुन्हा तोंडे उघडली आहेत. दादरमधील कोतवाल उद्यानाजवळील पुलावर, तसेच दहिसरमधील अशोकवन ते रावळपाडा रोड, बाळगोविंददास रोड आणि अनेक भागांमधील खड्डयांच्या समस्या पुन्हा  निर्माण झाल्या आहेत.



खड्डयांच्या तक्रारी

सध्या अनेक भागांमध्ये खड्डे पडल्याच्या तक्रारी येत आहेत. मंगळवारच्या पूरसदृश्य स्थितीनंतर सफाईसह अन्य कामे पूर्ण करण्याकडे कामगारांचा भर आहे. त्यामुळे, पावसाने पूर्ण रजा घेतल्यास दोन दिवसांमध्ये हे खड्डे बुजवले जातील, अशी माहिती रस्ते प्रमुख अभियंता व संचालक विनोद चिठोरे यांनी दिले आहे.


दोन दिवसांत बुजवणार खड्डे

मुंबईत प्रकल्प रस्ते, तसेच जे रस्ते दुरुस्त केले होते, या सर्व रस्त्यांची यादी तयार असून या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडल्यास कंत्राटदारांकडून हमी कालावधी अंतर्गत भरून घेतले जातील. तसेच जे रस्ते हमी कालावधीत नाहीत, ते महापालिकेच्या वतीने बुजवले जातील. यासाठी डांबर मिश्रित खडी उपलब्ध करून दिली. प्लांटमध्ये मटेरियलही आहे, त्यामुळे हे खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर घेतले जाईल, असे चिठोरे यांनी सांगितले.



हेही वाचा

मुंबईत पाऊस ओसरला, कचरा मात्र साचला!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा