Advertisement

लॉकडाऊनमधील 'अन्नदाते'! खानावळ ठरतायेत अनेकांचा आधार

खानावळी चालकांवर मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. पण या परिस्थितीतही खानावळ सुरू असून गैरसोय होत असलेल्यांच्या पोटाचा आधार ठरत आहेत.

लॉकडाऊनमधील 'अन्नदाते'! खानावळ ठरतायेत अनेकांचा आधार
SHARES

वाढती महागाई, घरात कमावती व्यक्ती एकच अशा परिस्थितीत कुटूंबाला हातभार लावण्यासाठी अनेकांनी खानावळ सुरू केल्या. विद्यार्थी, कर्मचारी वर्ग याशिवाय बॅचलर्स हे या खानावळांचे केंद्रबिंदू. पण कोरोनाच्या संकटात या खाणावळ्या ओस पडल्या आहेत. त्यामुळे खानावळी चालकांवर मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. पण या परिस्थितीतही खानावळ सुरू असून गैरसोय होत असलेल्यांच्या पोटाचा आधार ठरत आहेत.


अनेकांना खानावळांचा आधार

गेले तीन महिने कोरोनामुळे अनेक व्यवसाय ठप्प पडले आहेत. त्यापैकीच एक व्यवसाय म्हणजे खानावळ. दररोज हॉटेलमध्ये जाऊन जेवणं परवडणारं नसल्यानं अनेक ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी आपोआपच घरगुती खानावळीकडे वळतात.

बरेच नोकरी-धंदा करणारे हे दुसऱ्या शहरातून मुंबईत आलेले असतात. अशांसाठी देखील खानावळ हा चांगला पर्याय असतो. पण कोरोना काळात नोकरीवर कुऱ्हाड आल्यानं किंवा जेवणाची व्यवस्था होऊ शकत नसल्यानं अनेक जण आपल्या घरी गेले. त्यामुळे खानावळ चालकांचे रोजचे ग्राहक तोडले गेले.

याशिवाय मुंबई सारख्या शहरात अनेक विद्यार्थी भाड्याच्या घरात किंवा वस्तीगृहात, कॉट बेसीसवर राहतात. असे विद्यार्थी जवळच्या घरगुती खानावळीत जेवणाची किंवा डब्याची व्यवस्था करायचे. पण लॉकडाऊन काळात अनेक विद्यार्थी त्यांच्या घरी गेले. त्यामुळे अर्थात खानावळ चालकांचे ग्राहक घटले.


लॉकडाऊनचा फटका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफिसेस, शैक्षणिक संस्था, महाविद्यालय सर्वच बंद आहेत. परिणामी खानावळीचा मुख्य ग्राहकच नसल्याचं आर्थिक स्त्रोत थांबला होता. या सर्वांचा परिणाम खानावळी चालकांवर आणि त्यांच्या कुटूंबावर देखील झाला. पण खानावळ चालकांनी या परिस्थितीशी दोन हात करायचं ठरवलं.

लॉकडाऊन काळात देखील अनेक खानावळं सुरू होती. घरी स्वयपाक करता येत नाही असे वृद्धही अनेक आहेत. अशा सर्वांची दोन वेळच्या जेवणाची सोय देखील खानावळीतून होते.  टाळेबंदीत अशाच ग्राहकांचे हाल होऊ नयेत म्हणून अनेक खानावळ चालकांनी खानावळ चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. कार्यालये आणि कॉलेजेस बंद असली तरी लॉकडाऊन काळात घरगुती जेवणासाठी जास्त डबे मागवले गेले.


"आर्थिक गणितं बिघडली"

माहिम इथल्या स्वाती झाटगे या घरातूनच खानावळ चालवतात. गेली अनेक वर्ष त्या खानावळ चालवत आहेत. लॉकडाऊन काळात देखील त्यांच्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी खानावळ चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी हा निर्णय कठिण होता. पण लोकांसाठी आणि स्वत:च्या कुटुंबाची आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी त्यांनी हा धोका पत्करला. पण ऑर्डर कमी झाल्यानं त्यांची आर्थिक गणितं बिघडली.

आमच्याकडे आधी १५ ते १८ जेवणाचे डबे असायचे. पण आता केवळ ५ ते ६ जेवणाच्या डब्यांची ऑर्डर आहे. काही ऑफिसेसमधून डब्यांची ऑर्डर असायची. पण लॉकडाऊन लागू झाला आणि त्यांच्या ऑर्डर बंद झाल्या. त्यामुळे आता फक्त घरच्या डब्यांची ऑर्डर असते. ते पण ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही खानावळ चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. 

स्वाती झाटगे, खानावळ काकू  

स्वाती यांनी खानावळ चालू ठेवण्याचा निर्णय घेतला पण त्यासाठी त्यांनी योग्य ती काळजीही घेतली. भाज्या आणल्या की त्या नीट साफ करणे, जेवण बनवताना मास्क आणि ग्लव्ज वापरणं, डबा घ्यायला येणाऱ्यांसोबत योग्य अंतर राखणे आदी गोष्टी काटेकोरपणे त्यांच्याकडून पाळल्या जातात.


"घरगुती डब्यांच्या ऑर्डर्स वाढल्या"

तर दादरमधल्या कॉहिनूर जवळील कॉर्नरवर स्वाद नावाचं एक दुकान होतं. हे दुकान रामदास पाटील नावाचे गृहस्थ चालवतात. लॉकडाऊनमध्ये त्याचं स्वाद हे छोटसं खानावळाचं दुकान त्यांनी बंद ठेवलं. पण कुणाची गैरसोय होऊ नये म्हणून घरातूनच त्यांनी खानावळ चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. पण लॉकडाऊनमध्ये त्यांच्याकडे ऑर्डर कमी नाही झाल्या तर अधिकच वाढल्या.

आमच्याकडे जास्त ऑर्डर घरातूनच येत होत्या. एका इमारतीतून जवळपास ९ ते १० ऑर्डर असायच्या. लॉकडाऊनमध्ये कार्यालयं बंद होती. त्यामुळे त्यांच्या ऑर्डर कमी झाल्या. फक्त सावरकर हॉल, सुश्रृशा इथं जेवण पोहोचवायचो. जेवण बनवताना तोंल बांधणे, ग्लोज घालणं, तुरटीच्या पाण्यानं हात धुणे हे नियम पाळतो. याशिवाय योग्य ती खबरदारी घेऊनच मी जेवणाची ऑर्डर सोसायटीच्या किंवा ऑफिसेसच्या गेटपर्यंतच पोहचवतो. गेटवर देखील माझा ताप मोजणे, ऑक्सीजनची पातळी तपासणे आदी खबरदारी घेतली जाते.

लॉकडाऊनमध्ये भाजी मार्केट बंद होते. भाजी मार्केट बंद असल्यानं थोड्या समस्या आल्या. पण घराजवळील एका सोसायटीत भाजीचा ट्रक यायचा. तिकडूनच मी भाज्यांची सोय करायचो. याशिवाय कडधान्य हा देखील पर्याय होताच.

रामदास पाटील, मालक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बंगल्या खाली असलेल्या सुरक्षा रक्षकांना डबा पोहोचवण्याची ऑर्डर देखील रामदास यांच्याकडे होती. शिवाय माटुंगा रोड इथल्या विकास गेस्ट हाऊसमध्ये काही जणं राहायला होती. त्यांच्या इथून देखील रामदास यांना जेवणाच्या ऑर्डर होत्या.


किंमती वाढल्यानं...    

दादरमधली मेलरॉय मेस सुरुवातीचे दोन महिने बंद होतं. २२ मे पासून त्यांनी मेस पुन्हा सुरू केली. पण त्यांनी त्यांच्या पद्धतीत थोडा बदल केला. जेवणाच्या ऑर्डर आदल्या दिवशी घेतल्या जायच्या. त्यानुसार दुसऱ्या दिवशी जेवणं बनवलं जायचं. ज्यांच्या ऑर्डर असायच्या त्या प्रत्येकाला वेगवेगळ्या वेळा दिलेल्या असायच्या. त्यावेळेतच लोकांनी जेवण घेण्यास येणं बंधनकारक होतं. जेणे करून लोकं एकाच वेळी जेवणं घेण्यासाठी येऊन गर्दी होऊ नये.  

दोन महिन्यांनी सुरू केलं तेव्हा जास्त ऑर्डर्स आम्हाला घरातूनच यायच्या. पण नंतर ऑर्डर कमी-जास्त होत राहिल्या. जेव्हा आम्ही मेस पुन्हा सुरू केली तेव्हा आम्ही कायच्याकाय खबरदारी घेतली होती. किचन सेनिटाईज करणं, बाहेरून आलेल्या भाज्या मीठ टाकलेल्या गरम पाण्यातून धुणं, प्लॅस्टिकचे पॅकेट्स साबणाच्या पाण्यातून काढणं अशी सगळी खबरदारी घ्यायचो. 

भाजी मार्केट बंद असल्यानं सुरुवातीला आम्ही भाज्या बंदच केल्या. फक्त कडधान्य बनवायचो. त्यामुळे आमचा मेन्यू खूप ठराविक असायचा. 

मिल्टन डिसोजा, मालक

लॉकडाऊनमध्ये जेवण बनवण्यास लागणारं जिन्नस म्हणजे कांदा, टॉमेटो, बटाटे हे सर्व महाग झालं होतं. याचा परिणाम जेवणाच्या दरांवर देखील झाला. प्रत्येक प्लेटमागे त्यांनी १० रुपये वाढवले होते. याशिवाय त्यांच्याकडे काम करणारे काही जणं लॉकडाऊन लागू झाल्याच्या १ महिन्यानंतर निघून गेले. तर काही जण नुकतेच निघून गेले.   

सध्या मेलरॉय बंद ठेवण्यात आलं आहे. कारण खानावळ चालवणारे मिल्टन डिसोजा आणि त्यांचे कुटुबियं पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह यायच्या काही दिवस आधीच त्यांनी मेस बंद केली होती. कारण परिसरात जास्त रुग्ण सापडत होते. खबरदारी म्हणून त्यांनी मेस बंद केली. मेस बंद करण्याच्या काही दिवसानंतरच ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतरच त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील पॉझिटिव्ह आढळले.  

मुंबईत अशा अनेक खानावळ आहेत ज्या लॉकडाऊनमध्ये देखील लोकांचं पोट भरत आहेत. थोडा स्वत:च्या घराचा आणि थोडा लोकांचा विचार करून तेही जोखीम उचलत आहेत.हेही वाचा


संबंधित विषय
Advertisement