मुंबईकरांचे पाणी महागणार!

 BMC
मुंबईकरांचे पाणी महागणार!
BMC, Mumbai  -  

मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या शुल्कात आता साडेपाच टक्क्यांनी वाढ होणार आहे. येत्या शुक्रवारी 16 जूनपासून या पाणी शुल्कात वाढ होणार असून, एक हजार लिटर पाण्यासाठी 19 ते 24 पैशांएवढी शुल्कवाढ होणार आहे. महापालिका प्रशासनाने शुल्कवाढीसंदर्भातील निवेदन स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्याचा प्रयत्न केला असता विरोधी पक्षांसह भाजपानेही याचा तीव्र विरोध दर्शवला आहे. परंतु दरवर्षी पाण्याच्या बिलामध्ये 8 टक्यांपर्यंत वाढ करण्याची पूर्वमंजूरीच स्थायी समितीने यापूर्वीच दिलेली असल्यामुळे केवळ माहितीसाठी हे निवेदन काढण्यात आल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

आर्थिक मंदीच्या काळामध्ये मुंबई महापालिकेच्यावतीने काटकसरीच्या तसेच अधिक महसूल मिळवण्याच्या उपाययोजना तत्कालिन महापालिका आयुक्त सुबोध कुमार यांनी आखल्या होत्या. त्या अनुषंगाने सन 2012-13 च्या अर्थसंकल्पीय भाषणात पाण्याच्या बिलांसह सर्व परवान्यांच्या शुल्कात 8 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानंतर मे 2012 मध्ये पाण्याच्या बिलात 8 टक्क्यांनी वाढ करतानाच मल:निस्सारण करत 60 टक्क्यां ऐवजी 70 टक्के एवढा कर आकारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. मात्र, या प्रस्तावामध्ये प्रत्येक वर्षी जूनमध्ये ८ टक्क्यांपर्यंत शुल्क वाढ करण्यात येईल,असे नमुद करण्यात आले होते. त्यामुळे या प्रस्तावालाच मंजुरी देण्यात आल्यामुळे दरवर्षी ही वाढ होत असते. मागील वर्षी ही वाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे यावर्षी ही वाढ करण्याबाबतचे निवेदन प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत माहितीसाठी सादर केले. परंतु हे निवेदन मांडण्यापूर्वीच विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपा गटनेते मनोज कोटक, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, सपाचे रईस शेख, मनसेचे दिलीप लांडे आदींनी विरोध दर्शवला. मात्र, त्यानंतरही हे निवेदन मांडल्यामुळे या सर्वांनी सभात्याग करत निषेध व्यक्त केला. या निवेदनामध्ये जलअभियंता विभागातील आस्थापना खर्च, प्रशासकीय खर्च, विद्युत शक्ती खर्च, शासकीय धरणातून उपसा केलेल्या पाण्याची पाणीपट्टी तसेच इतर देखभाल खर्च आदींसाठी सन 2015-16 मध्ये 765.32 कोटी एवढा खर्च झाला होता. तर सन 2016-17 मध्ये 806.56 कोटी रुपये एवढा खर्च झालेला आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत 5.39 टक्के एवढा खर्च वाढलेला असून, पाण्याच्या बिलातही 5.39 टक्के एवढी वाढ करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

प्रवर्ग
विद्यमान दर (रु)      
नवे दर (रु.)
घरगुती ग्राहक  
3.49  
3.68
प्रकल्प बाधितांची घरे
3.87
4.08
इतर घरगुती ग्राहक  
4.66
4.91
बिगर व्यावासायिक संस्था  
18.66
19.67
व्यावसायिक संस्था        
34.99
36.88
उद्योग धंदे, कारखाने      
46.65
49.16
रेसकोर्स,तारांकित हॉटेल्स  
69.98
73.75
शितपेये आणि मिनरल कंपनी  
97.20
102.44
Loading Comments