थकीत बिलांमुळे पोलीस वसाहतींचे पाणी तोडले

 Mumbai
थकीत बिलांमुळे पोलीस वसाहतींचे पाणी तोडले
Mumbai  -  

मुंबई - पोलीस कर्मचाऱ्यांच्या पगारातून घरभाड्यासह पाण्याचे शुल्कही गृह खात्याकडून वसूल केली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र गृह विभागाकडून पाण्याचे पैसे थकवले जात आहे. एकट्या अंधेरी आणि जोगेश्वरी पूर्व भागातच पोलीस वसाहतींचे पाण्याचे तब्बल साडेचार कोटी रुपये थकीत आहे. त्यामुळे या भागातील पोलीस वसाहतींमधील पाण्याच्या जोडण्या तोडल्या जात असून यामुळे पोलीस कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने सरकारी कार्यालये आणि वसाहतींनाही पाण्याचा पुरवठा केला जात आहे. परंतु सरकारी कार्यालयांकडून पाण्याचे बिले भरली जात नसल्यामुळे याचा फटका आता सरकारी वसाहतींना बसू लागला आहे. महापालिकेच्या के-पूर्व विभागातील अर्थात जोगेश्वरी आणि अंधेरी पूर्व भागांमध्ये २९ पोलीस कर्मचारी वसाहती आहेत. यासर्व पोलीस कामगार वसाहतींचे एकूण ४ कोटी २१ लाख ९६ हजार ८४१ रुपयांचे पाण्याचे बिल थकीत आहे. हे पाण्याचे बिल न भरल्यामुळे अंधेरी पूर्व येथील म्हाडा कॉलनीतील इमारत क्रमांक दहामधील ‘ए, बी आणि सी’ या इमारतींची जलजोडणी मागील दहा दिवसांपूर्वी कापण्यात आली होती. परंतु गृहविभागाने सुमारे १३ ते १४ लाख रुपयांची रक्कम भरली. त्यानंतर इमारतींचे पाणी मानवतेच्या दृष्टीकोनातून सुरू करण्यात आले. मात्र, जलजोडणी कापल्यामुळे येथील रहिवाशांना टँकरच्या पाण्यावर दिवस काढावे लागले.

एकाबाजुला सरकार पोलिसांच्या पगारातून घरभाड्यासह पाण्याचेही पैसे कापून घेते आणि प्रत्यक्षात पाण्याची बिले भरत नाहीत. त्यामुळे दिवसरात्र मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी घराबाहेर असलेल्या पोलिसांच्या कुटुंबांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अंधेरी आणि जोगेश्वरी पूर्व भागांमध्येच पोलिसांच्या सुमाऱ्या २९ वसाहती इमारती आहेत. यातील म्हाडा कॉलनीतील इमारत क्रमांक दहामधील जलजोडणी बिल न भरल्यामुळे कापली होती. परंतु आपण पोलीसस्तरावर पाठपुरावा केल्यानंतर सुमारे १३ ते १४ लाख रुपयांची रक्कम भरली. त्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत झाला. पण त्या कालावधीत टँकरने पाणीपुरवठा करावा लागलेला आहे. परंतु आजही चार कोटींपेक्षा अधिक रक्कम थकीत असल्यामुळे येथील पोलीस वसाहतींचे पाणी तोडले जाण्याची दाट भीती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त यांना पत्र पाठवून थकीत पाण्याचे बिल भरण्याची आपण मागणी केली असल्याचे सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी सांगितले. एकट्या अंधेरी आणि जोगेश्वरी पूर्व भागातच पाण्याची चार कोटी रुपयांची थकबाकी आहे. परंतु संपूर्ण मुंबईत ही रक्कम अधिक असल्याचे नर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गृहविभागाने ही रक्कम त्वरीत भरावी आणि पोलीस कुटुंबांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आणू नये, अशी सूचना केली.

Loading Comments