अभिनेत्री कंगना रणौत मुंबईत आली की तिला होम क्वॉरंटान करण्यात येईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. कोरोनाबाबतच्या सरकारी नियमांचा हवालाच महापौरांनी दिला. त्यामुळे कंगना आणि शिवसेनेतील वाद इतक्यात तरी शमणार नसल्याचंच दिसत आहे. (home quarantine compulsory for actress kangana ranaut in mumbai says bmc mayor kishori pednekar)
प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आयसीएमआरने कोरोनाबाबतची नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार परराज्यातून येणाऱ्या व्यक्तींना १४ दिवसांसाठी होम क्वॉरंटाइन केलं जातं. त्यांच्या हातावर क्वॉरंटाइनचा शिक्का मारला जातो. याच नियमानुसार बाहेरच्या राज्यातून मुंबईत येणाऱ्या कंगनालाही होम क्वॉरंटाइन केलं जाईल. कंगना ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहे. त्यामुळे ती मुंबई विमानतळावर येताच तिच्या हातावर होम क्वॉरंटाइनचा शिक्का मारला जाईल. याबाबत मी घेतली असून प्रशासन नियमानुसार योग्य ती कार्यवाही करेल, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
हेही वाचा - पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कंगनाच्या कार्यालयाची पाहणी
याआधी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंगना रणौतच्या पाली हिल परिसरातील कार्यालयाची पाहणी केली. मुंबई महापालिकेच्या नियमानुसार हे कार्यालय बांधलेलं आहे का? याचा आढावा यावेळी मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला. यासंदर्भात कंगनानं ट्विटरवर माहिती दिली. यासोबतच तिनं पालिका अधिकाऱ्यांवर आरोप देखील केले आहेत.
पाहणीसाठी गेलेल्या पथकात तीन अधिकारी आणि तीन कर्मचारी सहभागी होते. त्यांनी या संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली. कंगनाच्या कार्यालयाला लागून असलेल्या इतर बंगल्यांचीही पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. एकूणच या मार्गावर बांधकाम रस्त्यावर आलं आहे का? इतर गोष्टी बेकायदेशीर आहेत का? बांधकामाबाबत काही त्रुटी आहेत का? याचा आढावा पालिकेच्या पथकानं घेतला.
काही ठिकाणी त्यांनी रस्त्याची मापंही घेतली आहेत. यावेळी कंगनाच्या कार्यालयाच्या रंगरंगोटीचं काम सध्या सुरु आहे. हे काम करणाऱ्या पाच कामगारांचीही पालिकेच्या पथकानं किरकोळ चौकशी केली. त्यानंतर पालिकेचं पथक तिथून निघून गेलं.