Advertisement

कंगना गोत्यात? विधानसभा अध्यक्षांनी दिले २४ तासांत अहवाल सादर करण्याचे गृहमंत्र्यांना आदेश

मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना करणारी बाॅलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिच्याविरोधात पोलिसांत तक्रार झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांकडेही तक्रार करण्यात आली आहे.

कंगना गोत्यात? विधानसभा अध्यक्षांनी दिले २४ तासांत अहवाल सादर करण्याचे गृहमंत्र्यांना आदेश
SHARES

मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना करणारी बाॅलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिच्याविरोधात पोलिसांत तक्रार झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांकडेही तक्रार करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांनी पुढील २४ तासांत याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याच्या गृहमंत्र्यांना दिले आहेत. यामुळे कंगना आणखी गोत्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

याबाबतची माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. मुंबईची पाकव्याप्त काश्मीर व तालिबानशी तुलना करून बेछूट आरोप करणाऱ्या कंगनावर योग्य ती कारवाई करण्याची लेखी विनंती मी आज विधानसभा अध्यक्षांना केली. त्यांनी गृहमंत्र्यांना याची तातडीने चौकशी करून २४ तासात अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे, असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांना केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, चित्रपट अभिनेत्री कंगना रणौत यांनी ३ सप्टेंबर २०२० रोजी मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मीरशी केली असून मुंबई पोलिसांवर माझा विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे मुंबईत राहणं धोक्याचं आहे, अशा पद्धतीचं ट्विट केलं होतं. त्याचबरोबर काही लोकांच्या प्रतिक्रियेनंतर पुन्हा मुंबईची तुलना तालिबानसोबत करणारं ट्विट केलं. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुंबईतील राजकीय नेत्यांनी, समाजसेवकांनी आपली प्रतिक्रिया देऊन कंगना रणौतवर कारवाईची मागणी केली. परंतु अद्यापपर्यंत कंगनावर कारवाई झालेली नाही.

हेही वाचा- “मुंबईचा अपमान करणाऱ्या कंगनाला ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देणं धक्कादायक”

परराज्यातून आलेली एक मुलगी मुंबईत येऊन अभिनेत्री होऊन नाव कमावते, पैसा कमावते व त्याच मुंबईला बदनाम करत असताना तिच्यावर कारवाई न झाल्याने आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना दु:ख झालं आहे. शिवाय सुशांत सिंह राजपूत केसमध्ये ट्विट करून अनेक कलाकारांवर अंमली पदार्थांच्या सेवनप्रकरणी आरोप केले आहेत. तसंच काही कलाकारांनी कंगना रणौतवरही अंमली पदार्थांच्या सेवनाचे आरोप केले आहेत. त्यामुळे या सभागृहातील सर्व सदस्यांनी या घटनेची तीव्र निंदा करून सर्वानुमते कंगना रणौतवर कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव पारीत करावा, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केली.

त्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी हे निवेदन स्वीकारून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुढील २४ तासांत याप्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 

दरम्यान अभिनेत्री कंगना रणौतविरोधात मुंबईच्या खार आणि आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. खार इथं संतोष देशपांडे आणि आझाद मैदानात काँग्रेसचे कार्यकर्ते निजामुद्दीन रायन यांनी तक्रारी दाखल केली आहे. मुंबई पोलिसांविरोधात वादग्रस्त ट्विट केल्यानं ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा- कंगना रणौतविरोधात मुंबईत तक्रार दाखल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा