Advertisement

13 हजार 700 किलो दूषित बर्फ नष्ट


13 हजार 700 किलो दूषित बर्फ नष्ट
SHARES

महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात शहरातील फेरीवाल्यांकडील 75 टक्के बर्फाच्या नमुन्यांमध्ये ई-कोलाय जीवाणू आढळून आले होते. अतिसार, जुलाब, कावीळ इत्यादी जलजन्य आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या ई-कोलाय बाधीत बर्फाचे प्रमाण एम पूर्व विभागात 97 टक्के असल्याचंही पुढे आलं होतं. याच विभागात एप्रिल 2017 मध्ये 97 अतिसाराचे रुग्ण देखील आढळले होते. या पार्श्वभूमीवर एम पूर्व विभागात अनधिकृत फेरीवाले, सरबत विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यावर कारवाई करून 13 हजार 700 किलो दूषित बर्फ नष्ट करण्यात आला आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे एफडीएने मात्र आपल्याला मुंबईत दूषित बर्फ सापडलाच नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे एफडीआयच्या एकूणच कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

एम पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या एम पूर्व विभागाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 8 लाख 6 हजार 433 एवढी आहे. या विभागामध्ये गोवंडी, देवनार, मानखुर्द, तुर्भे, शिवाजीनगर, भारतनगर, गणेशनगर, सह्याद्रीनगर, अयोध्यानगर, गौतमनगर, विष्णूनगर, इ. परिसरांचा समावेश होतो.

या विभागासह महापालिकेच्या इतरही विभागांमध्ये अतिसाराच्या रुग्णांचे प्रमाण वाढले होते. त्यानंतर पालिकेेने या भागातील अनधिकृत खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांकडून, पेयपदार्थात वापरलेल्या बर्फ आणि पाण्याची चाचणी केल्यावर त्यात मोठ्या प्रमाणात ई-कोलाय जीवाणू आढळले. ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी अशा खाद्य आणि पेय पदार्थ विक्रेत्यांविरोधातील मोहीम तीव्र करण्याचे आदेश दिले होते. या कारवाईदरम्यान बर्फासोबत 135 सरबत द्रव्य, अन्नपदार्थ, सडलेली फळे, निकृष्ट गोड पदार्थ इ. देखील नष्ट करण्यात आले. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचं किलजे यांनी स्पष्ट केलं.

महापालिका क्षेत्रातील बर्फ आणि पाणी नमुन्यांमध्ये आढळून आलेल्या ई-कोलाय जीवाणूंचे प्रमाण लक्षात घेता रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाऊ नयेत, बाहेरील पाणी, सरबत, ऊस, फळांचा रस इत्यादी पिणे टाळावे. तसंच पाणीपुरी – भेळपुरी सारखे पदार्थ खाणेही टाळावे असं आवाहन महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे करण्यात आले आहे.

तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जेवणापूर्वी आणि अन्न शिजवताना, तसंच शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत, घरी शिजवलेले ताजे अन्न खावे, हिरव्या पालेभाज्या-फळे स्वच्छ धुवून खावेत. तसंच वैयक्तिक स्वच्छता राखा, मळमळ, उलटी, जुलाब यांसारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अशी सूचना महापालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिलीय. एवढं असूनही एफडीएकडून मात्र आतापर्यंत दूषित बर्फ आढळला नसल्याचं सांगण्यात आलंय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा