Advertisement

पालिका आयुक्तांनी शिवसेनेपुढे टाकली नांगी; मागे घेण्याच्या पत्रानंतरही प्रस्ताव मंजूर

सोमवारी महापौर निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि महापालिका आयुक्तांची बैठक झाली. या बैठकीत आयुक्तांची मनधरणी करण्यात उध्दव ठाकरे यशस्वी ठरले आणि आयुक्तांनीही त्यांचा मान राखत पाठवलेल्या पत्राबाबत एकही चकार शब्द काढला जाणार नाही याची काळजी घेतली.

पालिका आयुक्तांनी शिवसेनेपुढे टाकली नांगी; मागे घेण्याच्या पत्रानंतरही प्रस्ताव मंजूर
SHARES

स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाला आपली भूमिका मांडू न देता कचऱ्याचे प्रस्ताव परस्पर रेकॉर्ड करण्यात आल्यामुळे संतप्त झालेले पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी समितीपुढे पाठवलेले सर्व प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश सर्व विभागप्रमुखांना दिले होते. त्यानुसार विभागप्रमुखांनी मंजुरीला पाठवलेले सर्व प्रस्ताव मागे घेण्याची पत्रेही पाठवली होती.

 परंतु मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका आयुक्तांनी चक्क स्थायी समितीपुढे नांगी टाकली. प्रस्ताव मागे घेण्यासाठी पाठवलेल्या पत्रांबाबत प्रशासनानं एक चकार शब्दही काढला नाही. उलट समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पटलावरील सर्वच प्रस्ताव मंजूर करत आपला कार्यभाग उरकून घेतला.


पत्राबाबत एकही शब्द नाही 

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी यांच्या आदेशानुसार, स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी पाठवलेले सर्व प्रस्ताव मागे घेण्याची कार्यवाही करण्यात आली. यासाठी प्रशासनाच्या सर्व विभागप्रमुख आणि खातेप्रमुखांनी चिटणीस आणि प्रशासकीय समितीला पत्रही पाठवली. यामध्ये ११ सप्टेंबरच्या कार्यक्रम पत्रिकेवरील प्रस्तावांसहित जे प्रस्ताव राखून ठेवण्यात आले होते, तेही प्रस्ताव मागे घेण्याची कार्यवाही करण्यात आली होती.

 परंतु या पार्श्वभूमीवर सोमवारी महापौर निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि महापालिका आयुक्तांची बैठक झाली. या बैठकीत आयुक्तांची मनधरणी करण्यात उध्दव ठाकरे यशस्वी ठरले आणि आयुक्तांनीही त्यांचा मान राखत पाठवलेल्या पत्राबाबत एकही चकार शब्द काढला जाणार नाही याची काळजी घेतली.


खुलाशाची मागणी 

मंगळवारी झालेल्या सभेमध्ये विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपाचे गटनेते मनोज कोटक, सपाचे गटनेते रईस शेख, काँग्रेसचे आसिफ झकेरिया आदींनी प्रशासनाने प्रस्ताव मागे घेण्यासंदर्भात पाठवलेल्या पत्राबाबत खुलासा करण्याची मागणी प्रशासनाला केली. परंतु प्रशासनाच्यावतीनं उपस्थित असलेल्या अतिरिक्त आयुक्त डॉ.संजय मुखर्जी यांनी यावर एक चकार शब्दही काढला नाही.


पत्रांकडे दुर्लक्ष

स्थायी समिती अध्यक्ष मंजुरीसाठी पुकारत असलेल्या विषयांवर प्रशासनाच्यावतीनं प्रस्ताव मागे घेण्यासंदर्भात आलेल्या पत्राची आठवण महापालिका चिटणीस प्रकाश जेकटे हे अध्यक्षांना करून देत होते. परंतु या पत्रांकडे ना अध्यक्ष पाहत होते, ना मुखर्जी. त्यामुळे या पत्रांकडे दुर्लक्ष करत अध्यक्षांनी कार्यक्रमपत्रिकेवरील सर्व प्रस्ताव मंजूर केले. एरव्ही काही प्रस्ताव हे राखून ठेवले जातात. परंतु अध्यक्षांनी एकही प्रस्ताव राखून न ठेवता सर्वच मंजूर केले. आयुक्तांनी दबावतंत्र आणल्यामुळे ते मंजूर झाले की शिवसेनेपुढे आयुक्तांनी नांगी टाकली, असा प्रश्न आता सर्वांना पडलाय.



हेही वाचा -

मेट्रोची धाव आता भाईंदरपर्यंत!

परदेशी देणगीतील दुरावस्थेतील शाळाच अमेरिकन दूताला दाखवली




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा