Advertisement

शिवाजी पार्क मैदानातील 'तो' रस्ता वादाच्या भोवऱ्यात

महापालिकेच्या जी उत्तर विभागातील दादर परिसरात असलेल्या शिवाजी पार्क मैदानात खडी टाकून रस्ता तयार केला जात आहे.

शिवाजी पार्क मैदानातील 'तो' रस्ता वादाच्या भोवऱ्यात
SHARES

महापालिकेच्या जी उत्तर विभागातील दादर परिसरात असलेल्या शिवाजी पार्क मैदानात खडी टाकून रस्ता तयार केला जात आहे. शिवाजी पार्क मैदानाच्या मधोमध म्हणजे उद्यान गणेश मंदीर ते माँसाहेब मिनाताई ठाकरे स्मारक असा हा रस्ता तयार केला जात आहे. मात्र, या तयार होत असलेल्या रस्त्यामुळं ''शिवाजी पार्क मैदानात रस्ता? या रस्त्यावरून वाहतूक सुरू होणार का? मैदानात आता खेळायचं कसं?'' असे प्रश्न सामान्यांकडून उपस्थित केले जात आहेत. मात्र त्यांच्या प्रश्नांना महापालिकेनं उत्तर दिलं आहे. 

शिवाजी पार्क मैदानात मधोमध बांधला जाणारा संचलन रस्ता वादात सापडला आहे. या रस्त्यासाठी खडी वापरण्यास मनसे तसेच शिवाजी पार्कमधील रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे. खडीऐवजी विटांचे तुकडे किंवा मुरूमांच्या खडीचा वापर करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. याबाबत संबंधित कामाच्या सल्लागाराशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेऊ, असे पालिकेचे जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले आहे.

शिवाजी पार्क मैदानात माँसाहेब मीनाताई ठाकरे स्मारक ते उद्यान गणेश मंदिरापर्यंतच्या मोठ्या पट्ट्यात मैदानाच्या मधोमध पालिकेतर्फे रस्ता बांधला जात आहे. २६ जानेवारी, १५ ऑगस्टला होणाऱ्या पोलिस संचलनासाठी हा मार्ग बांधला जात असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. 

गेल्या काही दिवसांपासून शिवाजी पार्कमध्ये वादाचा विषय ठरलेल्या या प्रश्नी रविवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी शिवाजी पार्क नागरिक संघटना, शिवाजी पार्क जिमखाना, मैदानातील विविध क्लब, कबड्डी संघटना, समर्थ व्यायाम मंदिर यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी, पालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर व इतर अधिकारी यांची बैठक झाली. 

मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, सरचिटणीस संदीप देशपांडे, विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार हे ही उपस्थित होते. या बैठकीत राज यांच्यासह सर्व रहिवाशांनी मैदानात खडी टाकण्यास विरोध केला. मैदानात मातीचे काम करण्यास हरकत नाही. मात्र सिमेंट, खडी, रेती यांचा वापर करू नये, असे राज यांनी सांगितले. 

'मैदानात दररोज हजारो मुले खेळत असतात. क्रिकेटच्या खेळपट्ट्या आहेत. विविध प्रकारचे खेळ, सामने होत असतात. खडी उखडल्यास या खेळाडूंना त्रास होऊ शकतो. पालिकेने कितीही दावा केला तरी पावसाळ्यात खडी उखडून बाहेर येण्याची शक्यता आहे. 

महापालिकेचे अधिकारी बदलतील मात्र खडीमुळे समस्या निर्माण झाली तर त्याचा त्रास खेळाडू व रहिवाशांना होणार आहे,' याकडे राज यांनी लक्ष वेधले. त्यावर विटांचे तुकडे किंवा मुरूमाच्या खडीचा वापर करावा, अशी सूचना पालिकेला करण्यात आली.

या बैठकीनंतर रहिवासी व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मैदानात जाऊन रस्त्याची पाहणी केली. पालिकेने या रस्तेकामाचा नकाशा रहिवाशांना दाखवून खडीमुळे कोणताही त्रास होणार नाही, असा दावा केला. मात्र रहिवाशांनी खडीच्या वापरास आपला विरोध कायम ठेवला. 

यावर दिघावकर यांनी सल्लागाराशी चर्चा करून कळवू, असे रहिवाशांना सांगितले. सल्लागाराने विटांचे तुकडे, मुरूमाची खडी वापरण्यास परवानगी दिली तर पालिकेची त्यास हरकत नाही, असे दिघावकर यांनी स्पष्ट केले आहे.

रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात खडी टाकण्यात येत असल्याने परिसरात मैदानात काँक्रिटचा रस्ता बांधला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या रस्त्याखाली मैदानातील रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाच्या वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. खडीच्यावर मातीचा थर दिला जाणार आहे. त्यामुळे खडी मातीखाली दबली जाणार आहे. 

खडीमुळे पावसाचे पाणी झिरपून वाहिन्यांद्वारे मैदानातील ३६ विहिरींमध्ये जमा होईल. या पाण्याने मैदानात उडणारी धूळ रोखता येईल तसेच मैदानातील हिरवळ वाढेल, असा दावा पालिकेने केला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा