Advertisement

म्हाडा संक्रमण शिबिरात घुसखोरी झाल्यास अधिकारी निलंबित!


म्हाडा संक्रमण शिबिरात घुसखोरी झाल्यास अधिकारी निलंबित!
SHARES

म्हाडाच्या जुन्या-नव्या संक्रमण शिबिरातील रिकाम्या गाळ्यांमध्ये म्हाडाच्या नाकावर टिच्चून, टाळे तोडून घुसखोरी होत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या आहेत. मात्र त्याचवेळी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून म्हणावी तशी कडक कारवाई होत नसल्याचा आरोप संक्रमण शिबिरातील रहिवाशांकडून केला जात होता. मात्र आता अशा घुसखोरांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी मंडळाने ठोस उपाययोजना आणल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी सुमंत भांगे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली आहे.


घुसखोरांना तात्काळ निष्कासित करणार

घुसखोरांना आणि घुसखोरीला रोखण्यासाठी मंडळाने विशेष पथक तयार केले आहे. त्याचवेळी घुसखोरांच्या आणि घुसखोरीस जबाबदार असलेल्या दोषी अधिकाऱ्यांच्या मुसक्याही आवळण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. घुसखोरी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना तात्काळ निष्कासित (संक्रमण शिबिरातून बाहेर) करण्यात येणार आहे. तर दुसरकीडे घुसखोरीला जो अधिकारी जबाबदार असेल, चौकशीत जो अधिकारी दोषी ठरेल, त्याला तात्काळ निलंबित केले जाईल, असेही भांगे यांनी स्पष्ट केले आहे.

उपकरप्राप्त अतिधोकादायक इमारतीतील आणि कोसळलेल्या इमारतीतील रहिवाशांचे पुनर्वसन म्हाडाच्या संक्रमण शिबिरात केले जाते. हे पुनर्वसन करताना मूळ रहिवाशाला म्हाडाकडून व्हेकेशन नोटीस दिली जाते. या नोटिशीच्या आधारेच रहिवाशाची पात्रता निश्चित केली जाते आणि असेच रहिवाशी संक्रमण शिबिरात राहण्यास आणि पुढे कायमस्वरूपी घरासाठी पात्र ठरतात. असे असताना संक्रमण शिबिरात गेल्या काही वर्षांत घुसखोरी वाढत चालली आहे.


कशी होतेय घुसखोरी?

रिकाम्या गाळ्यात दलाल आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने घुसखोरी होत असल्याचा, तसेच हे गाळे विकले जात असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. असे अनेक घोटाळेही उघड झाले आहेत. नुकतेच अशाच एका प्रकरणात जावेद पटेल नावाच्या एका दलालाला अटकही झाली. तर पाच-सहा दिवसांपूर्वीच विक्रोळी, कन्नमवारनगर आणि मुलुंड येथील म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांमध्ये घुसखोरी झाली असून मूळ रहिवाशी वाऱ्यावर असल्याची माहिती ट्रान्झिट कॅम्प असोसिएशनचे अध्यक्ष अभिजीत पेठे यांनी दिली आहे.


मुळात घुसखोरांना निष्कासित करण्याबरोबरच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची तरतूद तशी जुनीच आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी म्हाडाकडून होत नाही. किमान आता तरी म्हाडाने या सर्व उपाययोजनांची आणि तरतुदींची कठोर अंमलबजावणी करत घुसखोरीची कीड दूर करावी, हीच आमची मागणी आहे.

अभिजीत पेठे, अध्यक्ष, ट्रान्झिट कॅम्प असोसिएशन


८५०० घुसखोरांना मोकळीक?

साधारणत: २००९-१० च्या सुमारास म्हाडाने एक सर्व्हे केला होता. या सर्वेक्षणानुसार अंदाजे ८५०० हजार घुसखोर संक्रमण शिबिरात असल्याचे समोर आले होते. या घुसखोरांना बाहेर काढण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही म्हाडाला घुसखोरांना बाहेर काढण्यात यश आले नाही. त्यामुळेच, या घुसखोरांविरोधात दंडात्मक कारवाई करत त्यांना कायम करण्याचा प्रस्ताव म्हाडाने सरकारकडे पाठवला आहे. त्यावर निर्णय प्रलंबित आहे. मात्र, म्हाडाच्या नव्या उपाययोजनांनुसार म्हाडा सर्व्हेच्या ८५०० घुसखोरांना वगळून नव्याने घुसखोरी केलेल्यांना वा घुसखोरी करणाऱ्यांना रोखण्यासाठीच मंडळाच्या या उपाययोजना असतील.



हेही वाचा

घोटाळ्यातले 'मास्टर'! म्हाडाने जाहिरात न देताच केलं शिवाजी पार्कच्या घराचं वितरण?

अभिनेत्री दिपाली सय्यदचा म्हाडाला फसवण्याचा प्रयत्न?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा