अभिनेत्री दिपाली सय्यदचा म्हाडाला फसवण्याचा प्रयत्न?


SHARE

प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यदिग्दर्शिका दिपाली सय्यद ही नुकत्याच पार पडलेल्या म्हाडाच्या लॉटरीत विजेती ठरल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून झकळल्या. दिपालीचे कौतुक झाले, अभिनंदन झाले. पण लॉटरी पार पडून काही तास उलटत नाहीत, तोच दिपाली सय्यदच्या बाबतीच एक धक्कादायक बाब उघड झाली आहे.


याआधीही दिपालीला लागलं होतं घर

दिपाली सय्यद म्हाडाच्या घरासाठी कलाकार कोट्यातून पहिल्यांदाच विजेती ठरलेली नाही. 2010 मध्ये म्हाडाच्या वर्सोव्यातील घरासाठी प्रतिक्षा यादीवर ती पात्र ठरली होती. शिवाय तिने घराचा ताबाही घेतला आहे.

एकदा म्हाडाच्या घराचा ताबा घेतला असताना दुसऱ्यांदा कलाकार कोट्यातूनच दिपाली सय्यद कसा काय अर्ज करू शकते? अशी चर्चा म्हाडात आहे. तर ही म्हाडाची फसवणूक असल्याचेही दबक्या आवाजात एेकायला मिळत आहे.


काय सांगतो म्हाडाचा कायदा?

म्हाडा कायद्यानुसार सामाजिक आणि इतर आरक्षणाद्वारे त्या त्या आरक्षित प्रवर्गात समाविष्ट होणाऱ्या व्यक्तीला त्या प्रवर्गातून एकदाच घराचा लाभ घेता येतो. म्हणजेच कलाकार कोट्यातून घराचा ताबा घेतल्यानंतर पुन्हा याच कोट्यातून अर्ज करता येत नाही. मुळात म्हाडाच्या घरासाठी एकदा लाभार्थी ठरल्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा लाभार्थी ठरणे वा लाभार्थी ठरण्यासाठी प्रयत्न करणे हे म्हाडा कायद्याचे उल्लंघन आहे, ही म्हाडाची फसवणूक आहे. हीच बाब नेमकी दिपाली सय्यदच्या बाबतीत घडली आहे.


वर्सोव्यात दिपालीचं घर

2009 च्या लॉटरीत दिपाली सय्यदने कलाकार कोट्यातून '236 वर्सोवा' या कोडसाठी अर्ज भरला होता. त्यात ती विजेती ठरली नाही. पण ती प्रतिक्षायादीत पहिल्या क्रमांकावर विजेती ठरली. तर तिच्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर प्रतिक्षायादीत निवेदिता अशोक सराफ यांचे नाव होते. त्यानुसार संकेत क्रमांक 236 मधील अपात्र विजेत्यांच्या जागेवर प्रतिक्षायादीवरील दिपाली सय्यदला घरासाठी पात्र ठरवण्यात आले. तर 8 मार्च 2010 मध्ये दिपालीने प्रत्यक्षात घराचा ताबा घेतल्याची नोंद म्हाडाच्या रेकॉर्डमध्ये असून 'मुंबई लाइव्ह'ने यासंबंधीची पूर्ण खात्री करून घेतली आहे.


म्हाडाच्या रेकॉर्डला कसलीच नोंद नाही!

वर्सोवा, न्यू म्हाडा कॉलनी, संकेत क्रमांक 236 मधील इमारत क्रमांक 6 ए, खोली क्रमांक 1106 या घराचे वितरण तिला म्हाडाकडून करण्यात आले आहे. सध्या ही इमारत 'शुभंकरोती सोसायटी' या नावाने ओळखली जाते. तर एनकेजीएसबी बँकेकडून दिपालीने घरासाठी कर्ज काढल्याची नोंदही त्यात आहे. महत्त्वाचे म्हणजे घराचा ताबा घेऊन पाच वर्षे झाल्याने तिने घर विकले आहे का? विकल्यास त्याचे हस्तांतरण झाले आहे का? याचीही खातरजमा केली असता अशी कोणतीही नोंद म्हाडाच्या रेकॉर्डला नसल्याचे समोर आले आहे.

या सर्व बाबी लक्षात घेता दिपाली सय्यद दुसऱ्यांदा म्हाडाच्या घरासाठी कलाकार कोटाच काय, कोणत्याही कोट्यातून अर्ज करण्यास पात्र ठरत नसताना तिने यंदा अर्ज केला आणि ती विक्रोळीतील घरासाठी विजेतीही ठरली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? दिपाली घराचा ताबा सोडणार, घेणार कि म्हाडा यासंबंधी कारवाईचे पाऊल उचलणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.


तक्रार आली तरच कारवाई?

आता पुढे काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. तर याचे उत्तर असे की, एक तर याबाबतीत म्हाडाच्या नियमानुसार आता दिपाली सय्यदने याआधीच घराचा ताबा घेतल्याचे कागदोपत्री समोर आले, तरच ती विक्रोळीतील यंदाच्या घरासाठी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. दुसरे म्हणजे आता याबाबत सर्वत्र चर्चा झाल्याने दिपाली कागदपत्रच जमा करणार नाही. असे झाल्यास हे घर प्रतिक्षायादीवरील विजेत्याला वितरीत करण्यात येईल. त्याहीपेक्षा महत्त्वाचे, जर तिने कागदपत्र जमा केले, मुंबईत कुठेही घर नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले आणि मग याविषयी एखादी तक्रार आली, तर याविरोधात म्हाडाकडून कडक कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली आहे.


आता दिपाली म्हणतेय, 'ती मी नव्हेच'!

याविषयी दिपालीशी संपर्क साधला असता तिने 'विक्रोळीतील घरासाठी मी नव्हे, तर माझ्या भावाने अर्ज केला आहे' असे सांगत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. पण कलाकार कोट्यातून दिपाली सय्यद हिच्या नावाने, तिच्या संपूर्ण माहितीसह, बँक खाते क्रमांकासह अर्ज भरण्यात आला आहे. त्यामुळे 'भावाने अर्ज भरला' असा दावा दिपाली कशी करते? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, मुंबईत घर नसल्याने अनेक कलाकार घरासाठी वणवण करत असताना एका कलाकाराने दोनदा कलाकार कोट्यातील घरांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणे कितपत योग्य आहे? असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

दरम्यान म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांच्याशी याविषयी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.हेही वाचा

आम्ही 'सेलिब्रिटी लाभार्थी', स्वरांगी मराठे, मिलिंद शिंदेला लागलं म्हाडाचं घर


संबंधित विषय