Advertisement

मुंबई विकास आराखड्याच्या माहितीबाबत महापालिका प्रशासनाचा दूजाभाव?


मुंबई विकास आराखड्याच्या माहितीबाबत महापालिका प्रशासनाचा दूजाभाव?
SHARES

मुंबई विकास आराखड्याबाबत नियोजन समितीने सादर केलेल्या आराखड्याची माहिती प्रभागनिहाय नगरसेवकांना देण्यास असमर्थता दर्शवणाऱ्या प्रशासनाने ‘टी’ विभागातील नगरसेवकांना मात्र, याचे सादरीकरण केले आहे. एकट्या ‘टी’ विभाग कार्यालयातील नगरसेवकांना याचे सादरीकरण करून देत प्रशासनाने महापालिकेतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांनाच अंधारात ठेवले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन भाजपाला झुकते माप देऊन 227 नगरसेवकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुंबईच्या प्रारुप विकास आराखड्याबाबत लोकांकडून हरकती व सूचना प्राप्त झाल्यानंतर या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सहा सदस्यीय नियोजन समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने मार्चमध्ये आपला अहवाल महापौरांना सादर केला. या अहवालावर 20 मेपर्यंत निर्णय घेणे बंधनकारक आहे. परंतु हा महापालिकेपुढे मांडण्यात आल्यानंतर विद्यमान विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी गटनेत्यांच्या सभेत सर्व विभाग कार्यालयांमध्ये संबंधित नगरसेवकांना विकास आराखड्यांचे सादरीकरण करून त्यांना माहिती दिली जावी,अशी मागणी केली होती. प्रभाग कार्यालयांसह महापालिका सभागृहातही यावर चर्चा करताना एकेका प्रभागासाठी दिवस निश्चित करून द्यावा,अशी मागणी केली होती. परंतु ही मागणी मान्य न करता, सर्व नगरसेवकांसाठी लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयातील सभागृहात सादरीकरण करून माहिती दिली जाईल,असे सांगत त्याप्रमाणे आयोजनही करून दिले.

सर्व नगरसेवकांसाठी शीव रुग्णालयातील सभागृहात विकास नियोजन आराखड्याबाबत सादरीकरण केल्यानंतरही गुरुवारी टी विभाग कार्यालयात प्रारुप विकास आराखड्याबाबतचे सादरीकरण करण्यात आले. नगरसेवकांसाठी प्रभाग निहाय स्वतंत्र सादरीकरण करण्यास नकार दिला जात असताना, केवळ भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केलेल्या सुचनेनुसार टी विभाग कार्यालयात सादरीकरण केले. त्यामुळे महापालिका नक्की कोण चालवतेय, हाच प्रश्न असून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांना बाजुला ठेवत प्रशासन भाजपाच्या हातचे कठपुतळी बनताना दिसत आहे. त्यामुळे भाजपा काय महापालिकेचे जावई लागलेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

राज्यातील आणि केंद्रातील सत्तेचा माज जर भाजपाला आला असेल तर त्यांचा माज आम्ही उरवल्याशिवाय राहणार नाही. महापौरांच्या उपस्थितीत आयुक्त आणि प्रशासनाचे अधिकारी प्रभाग निहाय स्वतंत्र सादरीकरण करणार नाही असे सांगतात व दुसरीकडे भाजपाच्या सांगण्यानुसार टी विभाग कार्यालयात त्यांच्या नगरसेवकांना सादरीकरण केले जाते. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे या महापालिकेत केवळ भाजपाचे आणि टी विभागातील नगरसेवक नसून या सभागृहात 232 नगरसेवक आहेत, हे प्रशासनाने विसरु नये. त्यामुळे आता तर सर्वच विभागांमध्ये प्रशासनाने आम्हाला हे सादरीकरण द्यायलाच हवे, अशी मागणी राहिल, असे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्पष्ट केले आहे.

हे सादरीकरण प्रभाग समिती अध्यक्षांना सुचना दिल्यानंतर करण्यात आले आहे. यामध्ये नगरसेवकांसह स्थानिक खासगी स्वयंसेवी संस्थाही यात होत्या. आम्ही पारदर्शी कारभार करत असल्यामुळे सर्वांच्या सुचना जाणून घेत असतो. त्यामुळेच प्रशासन आम्हाला मदत करत असते, पण ते विरोधी पक्षनेत्यांना का करत नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. खोडसाळपणा करणाऱ्यांना, जनता व अधिकारी ओळखतात, त्यामुळे त्यांची सुचना प्रशासनाने मान्य केली नसेल,असे भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी स्पष्ट केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा