बोगद्याचा प्रस्ताव धूळ खात

 BEST depot
बोगद्याचा प्रस्ताव धूळ खात

वडाळा - दक्षिण मुंबईतील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी वडाळा येथील टेकडीत बोगदा बांधण्याचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी पालिकेने आखला होता. त्यानुसार या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमली होती. मात्र अनेक वर्ष उलटूनही हा प्रस्ताव धूळ खात पडलेला आहे. पालिकेने अशाच प्रकल्पांसाठी नुकतीच ३१० कोटींची तरतूद केली आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या वडाळ्यातील या प्रकल्पाकडे पालिका दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

वडाळा पूलासमोर असलेल्या बरकत अली मार्गावरील वळसा मारल्यानंतर अवजड वाहनांना शहराबाहेर पडता येते. यामुळे इंधन व वेळही वाया जात असून वडाळा परिसरात वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत आहे. यामुळे टेकडीत बोगदा बांधण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त सुबोध कुमार यांनी घेतला होता. या बोगद्यामुळे दक्षिण मुंबईतील वाहनांना ईस्टर्न एक्सप्रेस फ्री वे ला मिळून शहराबाहेर पडणे शक्य होणार होते.

या प्रकल्पाची व्यवहार्यता पडताळून अहवाल तयार करण्याची जबाबदारी रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. मात्र अनेक वर्षे लोटले तरी या अहवालाचा पत्ताच नसल्याचे सूत्रांकडून समजते. याबाबत पालिकेचे प्रमुख अभियंते (पूल) शीतलप्रसाद कोरी यांच्याशी संपर्क साधला असता या प्रस्तावाबाबत काहीच माहिती नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

Loading Comments