SHARE

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मलबार हिल येथील कमला नेहरु उद्यानाच्या सुशोभिकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या कामादरम्यान हे उद्यान नागरिक व पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत उद्यानात मौजमजेसाठी येणाऱ्या बच्चेकंपनीचा मोठा हिरमोड होऊ शकतो.

सध्या सर्वच शाळांना उन्हाळ्याची सुट्टी आहे. या सुट्टीच्या दिवसांत मुंबईकर पालक आपल्या मुलांना घेऊन कमला नेहरू उद्यान गाठत आहेत. कमला नेहरू उद्यानामधील 'म्हातारीचा बूट' तर गेल्या अनेक पिढ्यांपासून पर्यटकांचे मनोरंजन करतोय. शाळांना सुट्टी लागल्यापसून उद्यानातील गर्दीत अनेक पटींनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत होते. परंतु आता पुढील काही दिवस तरी पर्यटकांना उद्यानात प्रवेश करता येणार नाहीय.

सुशोभिकरणाचे काम हाती घेतल्यानंतर गर्दीमुळे कामात अडथळा येऊ नये म्हणून पालिकेने हा निर्णय घेतलाय. तशा संदर्भातील स्पष्ट सूचनाही पालिकेकडून नागरिकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या बच्चेकंपनीला उद्यानात घेऊन जाण्याऐवजी इतर स्थळांचा विचार केलेलाच बरा.

संबंधित विषय
ताज्या बातम्या